Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रपूर वन अकादमी: 7 कोटी 23 लक्ष रू. निधी मंजूर

चंद्रपूर वन अकादमी: 7 कोटी 23 लक्ष रू. निधी मंजूर
अर्थ व  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर येथील वन प्रबोधिनी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्रासह स्‍वतंत्र इमारत, मुलभूत संरचनेसह बांधकाम करण्‍याबाबतच्‍या 7 कोटी 23 लक्ष 27 हजार रू. एवढया किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. शासनाच्‍या महसुल व वनविभागाने दिनांक 8 फेब्रुवारी 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.
 
केंद्र शासनाच्‍या आपत्‍ती निवारण विषयक योजनेची महाराष्‍ट्रात देखील अंमलबजावणी करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. त्‍याअनुषंगाने चंद्रपूर वन प्रबोधिनी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्रासह स्‍वतंत्र इमारत, मुलभूत संरचनेसह बांधकाम करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्‍याअनुषंगाने प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (संशोधन व प्रशिक्षण) यांनी शासनाला प्रस्‍ताव सादर केला होता. या प्रस्‍तावाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.
 
चंद्रपूर वन अकादमीमध्‍ये वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्र निर्माण करण्‍याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्‍लीच्‍या राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे कार्यकारी संचालक अनिल गुप्‍ता यांच्‍यासह आपत्‍ती व्‍यवस्‍थापन केंद्र यशदा, अग्‍नी सुरक्षा प्रशिक्षण महाविद्यालय नागपूर आदींसह बैठक घेवून या केंद्राचे स्‍वरूप निश्‍चीत करण्‍याच्‍या दृष्‍टीने उच्‍चस्‍तरीय बैठक्‍ घेतली होती. या केंद्रात नियमित प्रशिक्षण, पुर, वन वणवे, मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी आवश्‍यक असणा-या प्रशिक्षण दिले जावे. एखादा बिबट विहीरीत पडला किंवा गावातील एखादया घरात घुसला तर त्‍याची सुटका कशी करायची, या परिस्‍थीतीत लोकांनी नेमके कसे वागायचे याचा देखील त्‍यात समावेश असावा. वातावरणीय बदलामुळे वनातील काही वृक्ष प्रजाती, वन्‍यजीव प्रजाती नाहीशा होत आहेत का, होत असतील तर त्‍याचे रक्षण कसे करायचे याचा देखील या आपत्‍ती निवारण केंद्रात अभ्‍यास करता यावा यादृष्‍टीने या केंद्राची निर्मीती करण्‍यात यावी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली होती. वनविभागाचे नैसर्गिक आपत्‍ती निवारण केंद्र हे ज्ञान केंद्र झाले पाहिजे, तेथे नैसर्गीक आपत्‍ती निवारणाचे प्रशिक्षण, यासंबंधीची संशोधने झाली पाहीजे. या केंद्राच्‍या माध्‍यमातुन राबविण्‍यात येणारे प्रशिक्षण वर्ग, इतर कोर्सेस याचे एक उत्‍तम मॉडेल तयार करण्‍यात यावे व त्‍यासाठी लागणारे तंत्रज्ञान अत्‍याधुनिक व परिपूर्ण असावे तसेच त्‍यासाठी लागणा-या प्रशिक्षीत मनुष्‍यबळाचा विचार केला जावा, अशी भूमीका त्‍यांनी त्‍या बैठकीदरम्‍यान मांडली होती.
 
सदर वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्राच्‍या निर्मीतीसाठी 7 कोटी 23 लक्ष 27 हजार रू. च्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता प्रदान झाल्‍यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्‍ती निवारणाच्‍या प्रक्रियेतील महत्‍वपूर्ण केंद्र स्‍थापन होण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे. हे केंद्र अतिशय सखोल आणि लक्षाधरीत असुन हे केंद्र देशातीलच नव्‍हे तर आशियातील सर्वोत्‍तम केंद्र ठरेल, असा विश्‍वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पर्यटनमंत्री जयकुमार रावलांची हकालपट्टी करा - मलिक