अखेर शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्याही ९ आमदारांचा समावेश आहे. यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती मंत्र्यांच्या खातेवाटपाची. अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नसून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपासंदर्भात भूमिका मांडली आहे.
“मंत्रीमंडळ विस्ताराप्रमाणेच खातेवाटपही होईल”
दरम्यान, यावेळी सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या खातेवाटपाविषयीही एकनाथ शिंदेंनी माहिती दिली. “मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असं विचारलं जात होतं, तो झाला. त्याप्रमाणे खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी होतील. त्या वेळेवरच होतील. पण आम्ही कुठेही विकासाची कामं थांबू दिलेली नाहीत. कालच आम्ही अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर भरघोस अशी मदत दिली आहे. एनडीआरएफच्या नियमाच्याही दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. २ हेक्टरची मर्यादा होती, ती वाढवून आम्ही ३ हेक्टर केली आहे. असे अनेक निर्णय आम्ही महिन्याभराच्या काळात घेतले आहेत”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.