Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार बंड: ही गुगली नाही तर हा तर थेट दरोडा - शरद पवार

sharad pawar ajit pawar
, रविवार, 2 जुलै 2023 (17:56 IST)
"अजित पवारांनी घेतलेली विरोधी भूमिका ही राजकीय गुगली नसून हा तर थेट दरोडा आहे," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
 
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील 8 नेत्यांनी आज शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार बोलत होते.
 
"पक्षातील नेत्यांनी माझ्या विरोधी भूमिका घेतली आहे. हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. पुढील काळात घराबाहेर पडून शक्य तितक्या जास्त लोकांची आपण भेट घेणार आहोत," असं पवार यांनी म्हटलं.
 
अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी आज (2 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
आज राजभवनमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली.
 
यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे.
 
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत होते. पण या बैठकीची कल्पना शरद पवारांना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता अजित पवार हे राजभवनाकडे निघाल्याची बातमी समोर आली.
 
अखेर, केवळ अजित पवारच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील 9 मंत्री आज शपथ घेतील, याबाबत स्पष्ट झालं.
 
अजित पवार काय म्हणाले?
शपथविधीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपल्या निर्णयाबाबत माहिती दिली.
 
आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत, असा दावा अजित पवार यांनी केला.
 
यापुढेही आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आणि घड्याळ या चिन्हावरच निवडणुकीत उतरणार आहोत, असं पवार म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी – अजित पवार
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस या नावाखाली आणि घड्याळ या चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
शपथविधीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “आज आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, त्यामध्येही काही सहकाऱ्यांना संधी मिळेल. देश आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं पाहिजे, असं माझं आणि सहकाऱ्यांचं मत आलं. त्यामुळे आम्ही सरकरमध्ये सहभागी झालो आहोत.
“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार जो चालू आहे, ते पाहता अतिशय मजबुतीने देश चालवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. सध्या विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यातून काहीही हाती लागत नाही. त्यामुळे मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो, पण शुक्रवारी मी त्याचा राजीनामा दिला. माझी भूमिका मी कार्यकर्त्यांसमोर मांडली होती.”
 
“गेल्या 24 वर्षांपासून पक्ष वाढवण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी काम केलं. यापुढे तरुणांसाठी काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. गेल्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. तेव्हासुद्धा विकासाचा एकमेव मुद्दा पाहून आम्ही निर्णय घेतला होता. आताही याच मुद्द्यावर आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
 
“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही याच नावाखाली आणि चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला न्याय देणं गरजेचं आहे. आम्हाला अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग सरकारला होईल. सोबतच पक्ष अधिक मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं.
 
हा प्रकार नवीन नाही - शरद पवार
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध होतं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल होतं.
 
मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे, असं म्हटलेलं होतं. पण आज त्यांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही सदस्यांना शपथ दिली आहे. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप सत्य नव्हते हे सिद्ध केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
 
आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. येत्या तारखेला मी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये काही प्रश्नांचा विचार करणार होतो. पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका याठिकाणी मांडली.
 
माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षातील विशेषतः विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याचं चित्र पुढील दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
 
ज्या नेत्यांची नावे आली आहेत, त्यापैकी काहींनी आजच मला संपर्क साधून आम्हाला याठिकाणी निमंत्रित केलं आणि सह्या घेतल्या आहेत, पण आमची भूमिका वेगळी आहे, असा खुलासा केलेला आहे.
 
याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही. कारण याचं स्पष्ट चित्र त्यांनी माझ्याप्रमाणेच जनतेसमोरही मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडलं तर त्याबाबत माझा विश्वास बसेल. अन्यथा त्यांनी विरोधी भूमिका घेतली, असा निष्कर्ष मी काढेन. असा प्रकार हा इतरांसाठी नवीन असेल, पण माझ्यासाठी तो नवीन नाही.
 
1980 साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो, त्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते, त्यापैकी 5 वगळता सगळे जण माझा पक्ष सोडून गेले होते. त्यानंतर फक्त 5 लोकांना घेऊन मी पक्ष वाढवण्यासाठी बाहेर पडलो. त्यानंतर पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत आमची संख्या 69 वर गेली.
 
ही संख्या नुसतीच वाढली नाही. तर पक्ष सोडून गेलेल्यांपैकी 3-4 सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळे 1980 सारखंच चित्र महाराष्ट्रात आता निर्माण झालं आहे. आता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर कसं मांडता येईल, याचा प्रयत्न मी करणार आहे.
 
महाराष्ट्राच्या जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे. 2019 च्या निवडणुकीतही असंच चित्र होतं. पण महाराष्ट्रात जाऊन आम्ही आमची भूमिका मांडण्याचं काम आम्ही केलं. त्याचा परिणाम म्हणून आमची संख्या वाढली आणि संयुक्त सरकारही आम्ही स्थापन केलं.
 
मला आज देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन येत आहेत. या सगळ्या परिस्थितीत आप
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नाही - महेश तपासे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांच्या शपथविधीला अधिकृत पाठिंबा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी हे सगळे शरद पवार यांच्याबरोबरच आहेत."
 
शपथविधीचा कार्यक्रम झाला तो खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटसचाच भाग होता. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नाही. ज्यांनी शपथ घेतली तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने उभारणी करु’, असं तपासे म्हणाले.
 
विकासाच्या राजकारणाला पवारांनी साथ दिली - मुख्यमंत्री
 
विकासाच्या राजकारणाला अजित पवारांनी साथ दिली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधीनंतर दिली.
 
ते म्हणाले, "कर्तृत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जातं, त्यावेळी अशा प्रकारच्या घटना घडत असतात, हे आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे. त्यामुळे डबल इंजीनच्या सरकारला तिसरं इंजीन लागलेलं आहे."
 
"हे सरकार बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने धावेल. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल, राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल," असं शिंदे म्हणाले.
 
महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस' झाला - राज ठाकरे
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
 
अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे ट्वीट करून म्हणाले, "उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईल.
"तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं."
 
"बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार," असं ठाकरे म्हणाले.
 
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन पवारांची शपथ - राहुल नार्वेकर
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
 
पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शपथ घेतली की वेगळा गट म्हणून शपथ घेतली, याबाबत माहिती देण्यास नार्वेकर यांनी नकार दिला.
 
शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाईटी टांगती तलवार आहे, ती बाब न्यायप्रविष्ट आहे. त्या गोष्टी योग्य वेळी होतील, असं ते म्हणाले.
 
राज्याच्या विकासासाठी अजित पवार आमच्यासोबत - बावनकुळे
देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी आमच्यासोबत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
 
काँग्रेस 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत – नाना पटोले
भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टी दाखवून लोकांच्या विचारांशी खेळणं आणि मूळ मुद्दे बाजूला सारून लोकांवर अन्याय करणं हेच ऑपरेशन लोटस आहे, पुढे काय होतं हे आम्ही वेट अँड वॉच करणार आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
 
माझं जयंत पाटील यांच्याशी बोलणं झालं. तेसुद्धा स्पष्ट भूमिका मांडत नाहीत. जोपर्यंत शरद पवार भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत ते बोलणार नाहीत. अजित पवारांनी पक्ष म्हणून जात असल्याचं म्हटलेलं आहे, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असं ते म्हणाले.
 
महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल - संजय राऊत
मला विचाराल तर हा भूकंप वगैरे मी मानत नाही. काही गोष्टी भविष्यात राजकारणात घडणार होत्या, त्या घडलेल्या आहेत, असं शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी म्हटलं.
 
अजित पवारांसोबत त्यांच्या लोकांनी शपथ घेतल्याचं आम्ही पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे सध्याचं सरकार अस्थिर आहे. 165 आमदारांचा पाठिंबा असतानाही त्यांना अजित पवार आणि त्यांच्या 35 आमदारांची गरज लागते.
 
एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार ते अपात्र आहेत. हे सरकार घटनाबाह्य आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार आणि नंतर इतर आमदार अपात्र ठरतील. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांना सोबत घेतलं आहे.
 
शपथ घेतलेल्या अनेक लोकांविरुद्ध भाजपने मोहीम राबवली होती. त्यांचं भाजप आता काय करणार हा प्रश्न आहे.
 
पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र होतील, हे सध्या स्पष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले.
 
माझं शरद पवारांसोबत बोलणं झालं. ते खंबीर आहेत. त्यांनी चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही चर्चा झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पुन्हा उभी राहील.
 
शिवसेनेच्या बाबतीत जे घडवलं, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडवलं याला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही, हे पुढच्या काळात दिसून येईल, असंही राऊत यांनी म्हटलं.
 
शरद पवारांची पत्रकार परिषद
तत्पूर्वी, अजित पवार राजभवनकडे निघाल्याची बातमी येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती.
 
यावेळी ते म्हणाले, " मुंबईतील बैठकीविषयी मला कल्पना नाही. विरोधी पक्ष नेते म्हणून आमदारांची बैठक बोलावण्याचा त्यांना अधिकार आहे. सुप्रिया सुळे मुंबईहून पुण्यासाठी निघाल्या आहेत.
 
प्रदेशाध्यक्ष आणि संघटनेतल्या बदलांबाबत 6 जुलैला बैठक मी बोलावली आहे. पक्षाच्या प्रमुख लोकांना मी निमंत्रित केलं आहे.
 
मी एकटा निर्णय घेत असतो. सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. आम्ही एकत्र बसून मार्ग काढू शकतो. प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही.
 
अजित पवारांनी सांगितलं की विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे विरोधी पक्षनेते झाले. पक्षाची घटना आहे. राज्याचे, विधिमंडळाचे पदाधिकारी आहेत. बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
 


Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिंदे सरकार लवकरच पडणार, या गोष्टी घडणार होत्या -संजय राऊत