भ्रष्टाचार आणि खंडणी वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी चांदीवाल आयोगाच्या समोर उपस्थित करण्यात आले. या सुनावणीदरम्यान अनिल देशमुख यांनी आयोगाला एटीएसच्या अहवालाची प्रत देण्याची विनंती केली. देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर एटीएसच्या अहवालात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. याआधीच्या सुनावणीतच एटीएसने अॅंटेलिया बॉम्ब प्रकरणातील मनसुख हिरेन हत्याकांडाचा ८०० पानी अहवाल चांदीवाल आयोगाकडे सुपूर्द केला होता.
महाराष्ट्र दहशताद विरोधी पथक (ATS) ने अॅंटेलिया बॉम्ब प्रकरणात मनसुख हिरेनच्या हत्येनंतरचा अहवाल हा चांदीवाल आयोगाकडे दाखल केला होता. एकुण ८०० पानी अहवाल हा आयोगाकडे याआधीच्या सुनावणीत सादर करण्यात आला होता. या अहवालात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसुली केल्याचा आरोप करणारे पत्र हे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिले होते.