Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hinganghat जळीतकांड : हत्या प्रकरणात विक्की नगराळे दोषी

Hinganghat जळीतकांड : हत्या प्रकरणात विक्की नगराळे दोषी
, बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (14:02 IST)
hinganghat jalti case
तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार 3 फेब्रुवारी 2020 रोजी घडला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
 
या तरुणीला जाळून मारणाऱ्या विकेश नगराळे या आरोपीवर दोष सिद्ध करण्यात आला आहे. आता यावर कोणती शिक्षा मागावी यावर उद्या युक्तीवाद होऊन उद्या 10 फेब्रुवारी 2022 रोजी शिक्षा सुनावली जाऊ शकते असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
"माझ्या मुलीला ज्या वेदना झाल्या, त्या वेदना आरोपीला जनतेसमोर झाल्या पाहिजेत, गेल्या 7 दिवसांत तिला खूप त्रास झाला. जसा माझ्या मुलीला त्रास झाला, तसा त्या आरोपीला झाला पाहिजे. निर्भयासारखं प्रकरण लांबायला नको, लवकर या प्रकरणाचा निकाल लागावा," असं मत पीडितेच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं.
 
हिंगणघाट जळीतकांडाचा खटला कसा चालला?
4 मार्च 2020 ला हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती.
घटनेनंतर 19 दिवसात 426 पानांचे दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांनी हे दोषारोपत्र दाखल केले होते.
पीडितेची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर हिंगणघाट न्यायालयात 64 सुनावण्या घेण्यात आल्या. त्यातील 34 सुनावण्यांवेळी उज्वल निकम सरकारी पक्षातर्फे हजर होते.
जळीतकांड प्रकरणात 77 साक्षीदार होते त्यापैकी 29 साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपी विकेश नगराळे घटनेच्या दिवशीपासून कारागृहातच आहे. कोव्हिडच्या लाटेमुळे 9 महिने सुनावणी लांबणीवर गेली.
उद्या 10 फेब्रुवारी 2022 रोजी प्रा. अंकिता यांच्या मृत्यूला दोन वर्षं पूर्ण होत आहेत. त्याच्या एक दिवसाआधी हा निकाल लागत असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र आता निकाल उद्याच लागण्याची शक्यता आहे.
पीडितेच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये काय लिहिलं होतं?
सकाळी साडे सहाच्या सुमारास पीडितेच्या हृदयाचे ठोके वेगाने कमी होऊ लागले. तिला वाचवण्याचे शक्य तितके सर्व प्रयत्न करण्यात आले.
10 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. पीडिता 35 टक्के भाजली होती. सेप्टिक शॉक हेही मृत्यूचं कारण आहे. (ज्या रुग्णांना अशा प्रकारचा संसर्ग झालेला असतो तेव्हा त्या संसर्गाशी लढताना रक्तदाब झपाट्याने कमी होतो आणि गुंतागुंत निर्माण होते.)
 
पीडितेचा मृतदेह पोलिसांकडे शवविच्छेदनासाठी सोपवण्यात आला आहे. असं ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलं होतं.
 
हिंगणघाट येथे नेमकं काय घडलं?
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून तरुणीला जाळल्याची घटना 3 फेब्रुवारीला घडली. या घटनेतील पीडिता 40 टक्के भाजली होती, त्यानंतर तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेविरोधात अनेक मोर्चे निघाले. राजकीय नेत्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हिंगणघाट तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरमध्येही नागरिकांनी बंद पुकारत या घटनेचा निषेध करण्यात आला होता.
 
प्रकरण काय?
3 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी एका महिलेचा 'वाचवा… वाचवा' असा आवाज आल्याने कुणाचा तरी वाहनाने अपघात झाला असावा याचा अंदाज घेत परिसरातून जाणारे विजय कुकडे यांनी आपली दुचाकी थांबवली.
 
"ती वेदनेनं विव्हळत होती. तिचा श्वासोच्छवास संथ झाला होता आणि श्वास घेतानाही तिला त्रास होत होता. आगीच्या ज्वाळांमुळे तिचे डोकं, मान आणि चेहरा जळून गेला होता. अशाच अवस्थेत एका लहान शाळकरी मुलीच्या स्वेटरच्या मदतीनं तिच्या शरीरावरील आग विझवून तिला हॉस्पिटलला नेण्यात आले. ही घटना आयुष्यात कधीही विसरता येणार नाही," विजय कुकडे सांगत होते.
 
दुचाकी वळवून मागे गेल्यावर कुकडे यांना एक महिला भर रस्त्यात जळतांना दिसली. क्षणाचाही विलंब न लावता कुकडे यांनी पिडितेच्या अंगावर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
 
पण ज्वाळा कमी होत नसल्याने एका शाळकरी मुलीने आपले स्वेटर काढून पिडितेला वाचविण्याचा प्रयत्न केला.
 
पीडितेच्या शरीरावरील ज्वाळा पूर्णपणे विझल्यावर तिला कारमधून हिंगणघाटच्या सरकारी हॉस्पिटलला नेण्यात आले आणि उपचार सुरू झाले.
"मी माझ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलो होतो. परत येत असताना नंदोरी चौकात एक मुलगा उभा होता, त्याच्या हाती पेटता टेंभा होता. हिवाळा असल्यामुळे शेकोटी पेटविण्यासाठी कचरा पेटवण्यासाठी ह्या व्यक्तीने टेंभा हातात घेतला असावा असा अंदाज मी व्यक्त केला. पण मागे गेल्यावर याच टेंभ्याने एका महिलेला पेटविण्यात आल्याच कळले," कुकडे त्या दिवसाबद्दल सांगतात.
 
प्रवाशांची तत्परता
आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्यानं अचानक घडलेल्या या घटनेनं पीडिता प्राध्यापिका किंचाळली, ती पेटत्या कपड्यांसह खाली बसली. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून एक दहावी अकरावीत जाणारा मुलगी धावत तिथे आली.
 
काही लोक पाणी टाकून पीडितेला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना या मुलीने आपले स्वेटर काढून पिडितेच्या अंगावर टाकले आणि आग विझली.
 
परिसरातील युवक सुशील घोडे यानेही धावून मदत केली. विजय कुकडे यांनी पीडितेला एका कारने हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
घटनाक्रम
सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने प्राध्यापिका एसटी बसमधून नंदोरी चौकात उतरली.
सकाळी 7 वाजून 7 मिनिटं - प्राध्यापिका महाविद्यालयाकडे हळूहळू पायी जाण्यास निघाली. त्याच वेळी एसटीच्या मागून दुचाकीने आलेला आरोपी विकेश नंदोरी चौकाजवळ थांबला.
सकाळी 7 वाजून 10 मिनिटं - गाडीतून पेट्रोल काढून. पेट्रोलने टेंभा भिजवला, नंतर तो प्राध्यापिकेच्या मागे पायीपायी गेला.
सकाळी 7 वाजून 15 मिनिटे - प्राध्यापिका चालत चालत न्यू महालक्ष्मी किराणा धान्य भांडारापर्यंत पोहचली. तेव्हा आरोपी विकेश नगराळे याने वेगाने चालत जात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकले.
सकाळी 7 वाजून 17 मिनिटे - पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोलने भिजवलेला पेटता टेंभा फेकून तो दुचाकीकडे पळाला.
सकाळी 7 वाजून 20 मिनिटे- हल्ल्या करण्याआधीच त्याने दुचाकी सुरू ठेवलेली होती. त्यावरून तो पळाला.
हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला त्यात आरोपी विकेशला पकडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला पण तो हाती आला नाही.
सकाळी 7 वाजून 20 मिनिटे - पीडितेला कारने शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
गृहमंत्र्यांनी घेतली होती पीडितेची भेट
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागच्या मंगळवारी रात्री रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली होती. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
"महिलांविरोधात हिंसक कृत्य करणा-या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकरात लवकर कायदा करणार आहोत," असं आश्वासन अनिल देशमुख यांनी दिलं होतं.
 
सैतानालाही लाजवेल असा हल्ला - डॉक्टर
"गेली 35 वर्षं मी आकस्मिक अपघात विभागात डॉक्टर म्हणून काम करतोय. पण हैवानालाही लाजवेल अशा पद्धतीनं एका प्राध्यापक महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेमुळे मी व्यथित झालोय. पीडितेच्या शरीरावर थेट पेट्रोल टाकून जाळल्यामुळे तिचा चेहरा, गळा, घसा, कानं, केस तसेच दातही जळून गेलेत. पीडितेची दृष्टी वाचली की नाही हे शु्द्धीवर आल्यावरच कळू शकेल. 35 वर्षांच्या मेडिकल करिअरमध्ये, एक डॉक्टर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही माझ्या उभ्या आयुष्यात असा हल्ला मी पाहिला नव्हता. हा हल्ला सैतानालाही लाजवणारा होता," अशी प्रतिक्रिया हिंगणघाट मधील पीडितेवर उपचार करणाऱ्या नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अनुप मरार यांनी दिली होती.
ते पुढे म्हणाले, "पीडितेला वेळीच आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, तेव्हा आम्ही तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवलं, उपचार सुरू केले."
 
10 फेब्रुवारी 2020 रोजी या पीडितेने शेवटचा श्वास घेतला.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अण्णा हजारे : किराणा दुकानातील वाईन विक्रीविरोधात आमरण उपोषणाचा इशारा