Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका "तोंडात गोड अन् मनात खोड!"

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका
, गुरूवार, 3 जून 2021 (19:30 IST)
मराठा आरक्षण विषयाचा पुर्ण विचका करण्याचे काम महा विकास आघाडीने केले. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका म्हणजे तोंडात गोड अन् मनात खोड अशी आहे, असा आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.
 
मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतीत  संवाद साधण्यासाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार चार दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यतिथी निमित्ताने परळीला गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे आणि कुटुंबिय यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर नांदेडकडे प्रयाण केले.
 
नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, शहर अध्यक्ष प्रवीण साले, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई चिखलीकर, डाँ. संतुकराव हंबर्डे उपस्थितीत होते.
 
यावेळी आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मराठा आरक्षण विषयात मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या कथनी आणि करनी यामध्ये फरक आहे. आरक्षण टिकणार असे सांगत होते आणि प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात  गायकवाड आयोगाच्या बाजूने युक्तिवादच केला नाही. गायकवाड आयोगाने समाजाचे संपूर्ण मागासलेपण सिध्द केले पण त्यातील परिशिष्ट इंग्रजी अनुवादासह न्यायालयात मांडली नाहीत.  सर्वांना हातात हात घालून चालले पाहिजे असे म्हणायचे पण मराठा समाजाच्या प्रतिनिधींंची समन्वय बैठकच घेतली नाही. त्यावर प्रतिक्रिया आल्यावर बैठका घेतल्या. चांगले वकील दिले पण वकिलांना सरकारने माहितीच द्यायची नाही. न्यायालयात वकीलांना हे सांगावे लागले. 102 व्या घटनादुरुस्तीवर केंद्राने भूमिका स्पष्ट करा म्हणायचे आणि जेव्हा केंद्राने भूमिका मांडली तेव्हा त्याचे समर्थन न करता आता इंद्रा सहानी निकालावर बोलायचे, आरक्षणाचा कायदा करा असे सांगत राज्यपाल महोदयांना भेटायचे त्याच दिवशी काँग्रेसचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आरक्षण नंतर मिळाले तरी चालेल पण सवलती द्या असे म्हणायचे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपूर्ण भूमिका ही तोंडात गोड अन् मनात खोड अशीच आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांचा अँड शेलार यांनी समाचार घेतला.
 
तसेच अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडताना वेळोवेळी दिखाऊपणा केला. आज ते इंद्रा सहानी निकालाचा फेरविचार करा असे केंद्र सरकारला सांगत आहेत मग काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना, स्वतः मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी हे का केले नाही. ?केंद्राने ठराव आणि कायदा करुन आरक्षण दयावे असे अशोक चव्हाण सांगत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना, मा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना का केला नाही ठराव? राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपतींनी आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहेत. मग कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळता आरक्षण दिले तर ते टिकेल का? असे प्रश्न उपस्थितीत करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांच्या एकुणच कार्यपद्धती व भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी आणि किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प - जयंत पाटील