मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तोच विचार राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना देत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही”, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.
“बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जन्म दिला असला तरी, आमच्यासारख्या लाखो-करोडो कार्यकर्त्यांना कर्माने बाळासाहेबांनी जन्म दिला आहे. त्यामुळे आमचा अधिकार त्यांच्याहून जास्त असून, कर्माने बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले. बाळासाहेब एक विचार, एक संस्कार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारे मार्गदर्शक नेतृत्व होते. बाळासाहेब संस्था आहे, त्यावर आमचाही अधिकार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे स्पष्ट आणि परखड बोलतात. त्यांच्या पोटात तेच ओठावर येते. राज ठाकरेंनी मुलाखतीत त्यांची भूमिका ठामपणे मांडली”,असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. पक्ष पुढे कसा न्यायचा. आम्ही आमची भूमिका पुढे घेऊन चाललो आहोत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत”, असेही नांदगावकर यांनी म्हटले.