छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हिंदू व्होटबँक तयार केली होती, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवाजी महाराज श्रद्धास्थान आहेत, त्यांना मर्यादित, छोटे करू नये, ते व्यापक होते. रयतेचे राजे होते. चंद्रकांत पाटील यांचे शिवरायांबाबतचे विधान चुकीचे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. राज्यातील सत्ताबदलाबाबत चंद्रकांतदादांनी केलेल्या विधानावरूनही बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना रात्री स्वप्न पडतात आणि सकाळी ते बोलत असतात, त्यामुळे सत्तते येण्याचे स्वप्न पडत असतात.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठिंबा दिला. ते म्हणाले की, नाना पटोले आक्रमक आहेत, शेवटी राजकारणामध्ये सर्वच व्हरायटी लागते. आम्हाला जसे नेतृत्व पाहिजे तसे मिळाले. नाना पटोलेंच्या आक्रमकपणामुळे पक्षात कोणी नाराज झाले तरी त्यांच्या लक्षात येईल. तसेच ते अनुभवी नेते आहेत. ते काँगेसच्या मुशीतील आहेत, म्हणून खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये आलेत, त्यांना मी सल्ला देणार नाही.
उमेदवार रिंगणात आहेत, उघड्यावर थोडीच सोडता येणार ?
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्यात आगामी निवडणुकीवर याचे परिणाम पाहायला मिळतील. सुप्रीम कोर्टात राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडलं नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानं निवडणूक थांबवण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. सगळ्या निवडणुका एकत्र घ्या असा आमचा आग्रह असल्याचं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, निवडणुका थांबणार नसतील तर उमेदवार उभे आहेत, उघड्यावर थोडीच सोडता येणार म्हणून आम्ही प्रचाराला लागलो. एक वेळेस ही निवडणूक घ्या सगळ्यांची इच्छा आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकांबाबत आता आम्हाला सरकार आणि निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल.
एसटी कामगारांनी समजून घ्यावे, सरकार सामावून घेऊच शकत नाही
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप पूर्णपणे तोडगा निघालेला नाही. काही भागातील एसटी सेवा सुरू झाली असली तरी बऱ्याच ठिकाणची एसटीची सेवा ठप्प आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण वर कर्मचारी ठाम आहेत. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एसटी कर्मचाऱ्यांना समजुतीने घेण्याचे आवाहन केले आहे. एसटीच्या कामगार बांधवांनी समजून घ्यावे. सरकार सामावून घेऊच शकत नाही, असे म्हटले आहे.
एसटीच्या संपकरी कामगार बांधवांनी समजून घेतले पाहिजे. किती ताणायचे हे ठरवावे. भाजपचे सरकार असतानाही एसटी विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेले नव्हता. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारच्यावतीन जेवढे चांगले आहे, तेवढे दिले आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
एसटीच्या संपकरी कामगारांनी आता थांबावे. संप संपुष्टात आणून कामावर रुजू व्हावे. जर आता त्यांनी ऐकले नाही, तर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.