जालना जिल्ह्यातही भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहू लागलंय. भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना हलवण्यात येत आहे. धरण क्षेत्रातील सांडव्यामध्येच 2 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. भिंतीला असलेली मोठ्या प्रमाणातील गळती पाहता, जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याशी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचं मत जाणून घेऊन धामणा धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे NDRF च्या टीमला आणि औरंगाबाद येथील आर्मीच्या टीमला ही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.