नाशिकमध्ये बीएडच्या सीएटी परीक्षेसंदर्भात मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बुधवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान बीएड साठी प्रवेश पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हॉल तिकीटवर बुधवारी ची २६ एप्रिल परीक्षेची तारीख देण्यात आलेली असतांना परीक्षा केंद्रावर मंगळवारीच परीक्षा होऊन गेल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर युवक काँग्रेस आणि शिक्षक आमदार सत्यजीत तांबे यांनी पाठपुरावा केल्यावर या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयात परीक्षेसाठी हलवण्यात आले. यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता जेएमसीटी आणि जेईटी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून नाशिकमध्ये येऊन पोहोचले होते.
दरम्यान, शासनाचे ऑनलाईन एक्झाम घेण्याचे कंत्राट ज्या EDU SPARK कंपनीकडे आहे तिच्यावर कारवाईची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी केली. तसेच सदर घटनेनंतर स्वप्निल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन विद्यार्थी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांत समन्वय साधून परीक्षा घेण्याची मागणी मान्य करून घेण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी वाहनाची देखील व्यवस्था करण्यात आली.