Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुष्काळी चारा छावणीत कडबा कटर मध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलाचे दोन्ही हात कापून तुटले

दुष्काळी चारा छावणीत कडबा कटर मध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलाचे दोन्ही हात कापून तुटले
सोलापूर येथे जनावरांसाठी ऊसाचा चारा कटींग करत असताना कडबा कटर मध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलाचे दोन्ही हात अडकून तुटले आहेत. ही धक्कादायक घटना  एखतपूर, ता.सांगोला येथील मायाक्का माऊली दूध उत्पादक संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या छावणीवर घडली आहे. विठ्ठल बलभिम गलांडे, वय १३, रा.एखतपूर, ता.सांगोला असे दोन्ही हात तुटलेल्या दुर्दैवी शाळकरी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सांगोला तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने जनावरांच्या छावण्या सुरु असून या छावण्यावर जनावरांची देखभाल करण्यासाठी पशु पालकांसह त्यांची मुले संगोपन करीत आहेत. एखतपूर येथे मायाक्का माऊली दूध उत्पादक संस्थेच्या छावणीवर सुरुवातीपासून बलभिम गलांडे (अमुने मळा) यांची सहा जनावरे छावणीवर आहेत. छावणी चालकाने दिलेल्या ऊसाचा चारा विठ्ठल गलांडे हा शाळकरी मुलगा कटर मध्ये घालत असताना अचानक काही समजण्याच्या आत त्याचा एक हात कडबा कटरमध्ये गेल्यामुळे त्याने घाईगडबडीने दुसरा हात घालून प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही हात कडबा कटर मध्ये अडकून कोपरा पासून तुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. यावेळी छावणीतील पशुपालकाने विठ्ठल यास गंभीर अवस्थेत तात्काळ उपचाराकरिता सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याच्या तुटलेल्या दोन्ही हातावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता मिरज येथे हलविण्यात आले. विठ्ठल गलांडे हा इयत्ता 7 वीत शिक्षण घेत असून त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसात निवारा शोधणाऱ्या कुत्र्यास कोमात जाई पर्यंत मारहाण, दोघांना अटक