Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्राचाळ: संजय राऊत यांच्यावर ज्यामुळे ईडीची कारवाई झाली ते प्रकरण काय आहे?

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (22:50 IST)
शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. मंगळवारी दुपारी ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्याचं समोर आलं.
 
1 हजार 38 कोटी रुपयांच्या कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचं म्हटलं आहे. पत्राचाळ जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे? आणि याच्याशी संजय राऊत यांचा संबंध कसा आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
पत्राचाळ प्रकरण काय आहे?
मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्रचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला.
 
म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला.
 
13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं.
पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1 हजार 34 कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली.
 
पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडा आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. EOW (Economic offence Wing) कडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे.
 
ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केलेले प्रवीण राऊत हे गुरुआशिष बांधकाम कंपनीचे माजी संचालक आहेत.
 
पत्राचाळ सिद्धार्थ नगर गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि पत्रकार पंकज दळवी सांगतात, "आम्हाला अजूनही ही घरं मिळालेली नाहीत. दरम्यानच्या काळात गुरूआशिष कंपनी HDIL ने टेक ओव्हर केली. घरं बाधांयचं सोडून परस्पर इतर बिल्डरला जमिनी विकण्यात आल्या. या जागेवर काही प्रमाणात काम झालं असून जळपास 306 घरांची लॉटरही म्हाडाने काढली आहे."
 
"नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन झाले. रहिवासी म्हणून राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. पत्राचाळीचं काम सुरू व्हावं. 672 लोकांना घरं मिळावी," असंही ते म्हणाले.
 
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांच्यावर कारवाई का?
पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. 1 फेब्रुवाराला ईडीने सात ठिकाणी झडती घेतल्यानंतर 2 फेब्रुवारीला ईडीने प्रवीण राऊत यांना ताब्यात घेतलं.
 
ईडीने आपल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, प्रवीण राऊत यांच्या जमिनी, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि वर्षा राऊत,स्वप्ना पाटकर यांच्या अलिबाग येथील जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.
म्हाडाने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यात गुरुआशिष कंपनी, सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान यांचाही समावेश असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
 
प्रवीण राऊत, सारंग वाधवान आणि राकेश वाधवान गुरुआशिष कंपनीचे संचालक असताना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले म्हणून या तिघांविरोधात ईडीने तपास सुरू केला.
 
गुरूआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 त्रयस्त बिल्डरांना FSI विकला आणि त्यातून 901 कोटी रुपये कमवले. तसंच रहिवाशांची घरंही बांधली नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे.
 
गुरूआशिष कंपनीने त्यानंतर मिडोज नावाचाही प्रकल्प सुरू केला आणि ग्राहकांकडून 138 कोटी रुपये कमवले. या बांधकाम कंपनीने बेकायेदशीरपणे हा पैसा कमवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे आणि त्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
 
गुरुआशिष बांधकाम कंपनी दरम्यानच्याकाळात HDIL ने टेक ओव्हर केली. HDIL संस्थेच्या बँक खात्यातून प्रवीण राऊत यांच्या बँक खात्यात 100 कोटी रुपये ट्रांसफर झाल्याचंही ईडीने म्हटलं आहे.
 
हीच रक्कम नंतरच्या काळात प्रवीण राऊत यांनी आपले निकटवर्तीय, नातेवाईक, सहकारी यांच्या खात्यात वळवले आणि 2010 मध्ये 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून जमा झाल्याचं ईडीने म्हटलं आहे. तसंच वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी या रकमेचा वापर केल्याचा दावाही ईडीने केला आहे.
 
ईडीने याची चौकशी सुरू केल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांना 55 लाख रुपये परत केल्याचंही निदर्शनास आलं आहे.
 
वर्षा राऊत यांच्या नावावर असलेले अलिबाग येथील 8 भूखंड सुद्धा जप्त केल्याचं ईडीने म्हटलं आहे.
 
प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.
 
'55 लाख रुपये परत केले?'
प्रवीण राऊत यांच्या पत्नी स्वप्ना राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2010 साली 55 लाख रुपये ट्रांसफर झाल्याचं ईडीने म्हटलं आहे. हेच 55 लाख संजय राऊत यांनी परत केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
ईडी कारवाई करणार हे संजय राऊत यांना माहिती होतं म्हणूनच त्यांनी प्रवीण राऊत यांना 55 लाख रुपये परत केले असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
 
"55 लाख परत केले याचा अर्थ संजय राऊत यांनी चोरीची कबुली केली आहे."असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
 
"संजय राऊत यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारात संजय राऊत यांचे आर्थिक पार्टनर प्रवीण राऊत यांनी घोटाळा केला. याप्रकरणात संजय राऊत यांनी मदत केली असावी, सहकार्य केले असावे असे दिसते. ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीला 55 लाख रुपये परत केले होते. ईडी आणि सोमय्या खोटं बोलत होते तर संजय राऊत यांनी 55 लाख परत का केले? 55 लाख चेकने परत केले मग कॅश किती मिळाले असतील?" असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
 
ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. संजय राऊत प्रकरणातही ईडीने आता इथेच थांबू नये, त्यांचे विमान तिकीट, हॉटेल बिल्स अशा सर्व गोष्टींची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
 
नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्रातील सरकारने कितीही दबाव आणला तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करतील असंही यावेळी सोमय्या म्हणाले.
 
संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सरकार पाडण्यासाठी मला विचारणा झाली होती मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून हा राजकीय दबाव आहे असं ते म्हणाले.
 
"दादरसाख्या भागात माझं फार फार तर टू रुम किचनचं घर आहे. एखाद्या मराठी माणसाचं असतं तसं. अलिबागला माझं गाव आहे. तिकडे साधारण 50 गुंठ्याची जमीन आहे. याला कोणी संपत्ती म्हणत असेल तर तेवढी संपत्ती आहे."
 
"मी झुकणार नाही, वाकणार नाही. यापूर्वी भाजपच्या काही लोकांनी मला सरकार पाडण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. तेव्हाच मी म्हटलं की काहीही करा हे काम होणार नाही. यापुढे कधीही गुडघे टेकणार नाही. माझी संपत्ती कष्टाच्या पैशांची आहे. हा राजकीय दबाव आहे,"
 
आपल्याकडे एकही रुपया बेकायदेशीरपणे कमवलेला नाही असंही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments