नाशिक (प्रतिनिधी) – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमीत्त लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरला जात असतात. या काळात वारकऱ्यांबरोबरच वाहनाने प्रवास करणारेही अनेक भक्त त्रंबक कडे रवाना होत असतात.
यासाठी म्हणूनच नाशिक त्रंबक नियमित चालणाऱ्या बस सेवांबरोबरच ज्यादा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय सिटी लिंकच्या वतीने घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात तब्बल 246 बस फेऱ्या सिटीलिंकच्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहे. पायी दिंडी आधीच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असल्या तरी बुधवारी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर याठिकाणी दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने तपोवन आगरातून १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बस फेर्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात तर नाशिकरोड आगारतून १० बसेसच्या माध्यमातून ६० बसफेर्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित बसफेर्यांव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर यात्रोत्स्वानिमित्त तपोवन आगारातून ६ बसेसच्या माध्यमातून ४८ तर नाशिकरोड आगारातून ४ बसेसच्या माध्यमातून ३२ अश्या एकूण १० जादा बसेसच्या माध्यमातून ८० जादा बसफेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दि. १८ व १९ जानेवारी असे दोन दिवस जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. जादा बसेस मिळून तपोवन आगारातून एकूण २१ बसेसच्या माध्यमातून १५४ बसफेर्या तर नाशिकरोड आगारातून १४ बसेसच्या माध्यमातून ९२ बसफेर्या नियोजित आहे. एकूणच दोन दिवसांत रोज २४६ बसफेर्या भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मार्गावर कार्यरत असणार आहे.जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor