Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयुर्वेद उपचार पध्दतीने रोगांवर नियंत्रण शक्य- वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर यांचे प्रतिपादन

आयुर्वेद उपचार पध्दतीने रोगांवर नियंत्रण शक्य-  वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर यांचे प्रतिपादन
, शनिवार, 26 जून 2021 (16:54 IST)
आयुर्वेद उपचार पध्दतीने विविध रोगांवर नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर यांनी केले.  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 संदर्भात ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन विभागाचे सदस्य मा. वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेस महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आशुतोष गुप्ता उपस्थित होते.
 
’आयुर्वेदा इन पोस्ट कोविड सिंड्रोम’ या विषयावर मार्गदर्शन करतांना केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन विभागाचे सदस्य मा. वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर यांनी सांगितले की, कोविड-19 आजारानंतर होणारे इतर विविध व्याधी व आजार टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पध्दती परिणामकारक आहे. कोविड-19 हा आजार हे असेच संपूर्ण वैद्यक विश्वापुढील आव्हान आहे. अशा वेळी आयुर्वेद या पुरातन भारतीय वैद्यकशास्त्राच्या ज्ञान, अनुभव व संशोधनाच्या आधारे या आजाराशी कसा सामना करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदातून शारिरीक व मानसिक व्याधींवर उपचार करणे शक्य आहे.
 
ते पुढे म्हणाले की, आयुर्वेदात अशा अनेक प्रकारच्या व्याधीचे वर्णन आहे. सुश्रूत आणि चरक संहितेत रोगांचे सूत्ररूपाने वर्णन केले आहे. आयुर्वेद उपचार पध्दतीचा यम व नियमांचे पालन केल्यास रोग बरा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने या संदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. योग्य प्रतिबंधात्मक उपाय केल्यास प्रकृतीचे नियमन करता येते.  शारीरिक व्याधीतून मुक्त होण्यासाठी आयुर्वेद उपचार पध्दती उत्तम आहे. कोविडच्या संकटातून बाहेर पडलेल्या बालकांनी व किशोरवयीन विद्यार्थ्यांनी नियमित आयुर्वेदिक सूत्रांचे पालन करावे असे त्यांनी सांगितले.
    
महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले की, आयुर्वेद व पारंपारिक जीवनशैलीचा वापर केल्यास मानसिक स्वास्थ्य व उत्तम आरोग्य लाभते. कोविड-19 नंतर होणारे आजार मान्यवर आपणांस बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत त्यांचे या व्याखनमालेसाठी स्वागत करतो. कोविड-19 संदर्भात आरोग्य विद्यापीठातर्फे ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून जनगागृती करण्याचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. सदर ऑनलाईन व्याख्यानमालेत जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप आवळे यांनी केले. विद्यापीठाकडून आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेस शिक्षक, पालक, विद्यार्थी, अभ्यागत व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या जेजुरीतील चिमुकल्या मुलींना आधार!