Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप
मुंबई , रविवार, 7 जून 2020 (21:35 IST)
रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात वीजपुरवठा नाही, परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्यांनाही केरोसिन पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
 
केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे.त्यानुंषगाने रायगड जिल्ह्यामध्ये ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटूंब मोफत केरोसिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात येत आहे.
 
जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांना वितरित होणा-या केरोसिनचा एक्स डेपो दरासह सर्व खर्च (घाऊक विक्रेत्याचे कमिशन, वाहतूक खर्च, लागू असेल तेथे अर्ध-घाऊक विक्रेत्यांचे कमिशन, किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन इ.) सुरुवातीला संबंधित केरोसिन विक्रेत्यांना राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांनाच केरोसिनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. मंजूर करण्यात आलेले विनाअनुदानित दराचे केरोसिन जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळ बाधित म्हणून निश्चित केलेल्या कुटूबांना व आवश्यक तेथे पात्र शिधापत्रिकाधारकांनाच होईल याची दक्षता घेण्याच्याही सूचना मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनू सूदवर संजय राऊतांची टीका, भाजपकडून बचाव