डॉ. महाजन बंधूंची सी टू स्काय मोहीम यशस्वी एव्हरेस्टवर मृत्यूच्या दाढेत अडकलेले डॉ. हितेंद्र आता सुखरूप

शनिवार, 25 मे 2019 (10:02 IST)
नाशिक सायकलिस्ट डॉ. महाजन बंधू यांची महत्वाकांक्षी सी टू स्काय - गेटवे ऑफ इंडिया ते एव्हरेस्ट ही मोहीम त्यांनी यशस्वी रित्या फत्ते केली आहे. मात्र सागरमाथा अर्थात एव्हरेस्टच्या सर्वोच्च टोकावर गिर्यारोहकांची गर्दी झाल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा घसरल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर यशस्वीपणे मात करत डॉ. हितंद्र आणि महेंद्र महाजन लुकला विमानतळ येथे डॉक्टर्सच्या देखरेखीखाली सुखरूप असून लवकरच काठमांडू येथे पोहचणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र नेहेते यांनी दिली.
 
३१ मार्च रोजी डॉ. महाजन बंधूंनी या मोहिमेची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून केली. तर नेपाळमधील एव्हरेस्ट कॅम्प १ वर ते १५ एप्रिल रोजी पोहचले. तेथून मिशन समिट साठी ते रवाना झाले. बुधवार (दि. २२) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महाजन बंधूंनी एव्हरेस्ट समिट गाठले.
 
डॉ. हितेंद्र महाजन यांची प्रकृती बिघडल्याबाबत सविस्तर माहिती डॉ. नेहेते आणि डॉ. मनिषा रौंदळ यांनी दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, बुधवारी (दि. २२) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डॉ. महाजन बंधूंनी माउंट एव्हरेस्टवरील ८८४८ मीटरवरील 'सागर माथा' या सर्वोच्च टोकावर भारताचा झेंडा फडकावला. मात्र मंगळवार आणि बुधवारी (दि. २१ व २२) हवामान स्वच्छ होते, त्यामुळे अनेक गिर्यारोहकांनी सोबतच्या शेर्पांसह एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्यास सुरुवात केली. यामुळे या निमुळत्या एकेरी मार्गावर मानवी ट्रॅफिक जाम झाले. चढाई करणे आणि उतरण्यासाठी एकाच मार्ग असल्याने एकमेकांना क्रॉस करून जाताना प्रत्येकाची कसरत होत होती. ५० ते ६० किमी वेगाने वाहणारा वारा आणि त्यात ऑक्सिजन वायूची मात्र अत्यंत कमी अशा परिस्थितीत एक पाऊल टाकणेही अवघड असते. येथे स्वतःच चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. कोणी मदत करून पाऊलही टाकू शकत नाही. अशात  या वेळी नेपाळच्या बाजूने २७२, तर चीन-तिबेटच्या बाजूने १२५ असे ३९७ गिर्यारोहक एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रॅफिक जाम झाले.
 
शिवाय, ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले. या वेळी नाशिकचे हितेंद्र व महेंद्र हे महाजन बंधूही एव्हरेस्ट उतरत होते. डॉ. महेंद्र यांना स्नो ब्लाइंडचा तर हितेंद्र यांनाही श्वसनाचा त्रास झाल्याने दोघांना बुधवारी रात्री बेस कॅम्प चार (आठ हजार मीटर उंचीवर) वर खाली आणण्यात आल्याचे डॉ. मनीषा रौंदळ यांनी सांगितले.
६ तासाऐवजी लागले १३ तास
२३ मी रोजी डॉ. हितेंद्र यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कॅम्प ४ वर आणणे अत्यावश्यक झाले होते. मात्र दुसऱ्याची मदत ना घेता येथे स्वतःचा उतरून यावे लागते. प्रचंड फिटनेस आणि मानसिक दृष्ट्या कणखर असल्यानेच डॉ. महाजन यांना हे शक्य झाले असले तरी साधारणपणे ४ ते ५ तासाचा प्रवास ९ तासाचा झाला. तर बेस कॅम्प ४ (८००० मीटर उंची) ते बेस कॅम्प २ (६४६१ मीटर उंची) हा केवळ ६ तसाच प्रवास १३ तासाचा झाला. तेथे डॉक्टरांच्या चमूने तपासणी केल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन हवाई मार्गाने त्यांना लोकला विमानतळावर थांबविण्यात आले आहे.
 
दरम्यान या मानवी ट्राफिक जॅममुळे झालेल्या काही दुर्घटनांत मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी, आसाम मधील एका महिला गिर्यारोहक, अमेरिकन नागरिक डोनाल्ड लिन तसेच अकलूजचे निहाल बागवान या तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्याने डॉ. महाजन बंधुंचीही सर्वांनाच काळजी लागली होती.नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी गणपती चतुर्थीच्या दिवशी महाजन बंधूंना सदिच्छा देण्यासाठी श्री क्षेत्र ओढा येथील गणपती मंदिराची राईड आयोजित केली होती. यावेळी मिळालेल्या गणपतीचा आशीर्वाद अशा कठीण प्रसंगी कमी आल्याची भावना नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी व्यक्त केल्या.
 
का झाली अचानक एवढी गर्दी?
 
डॉ. नेहेते यांनी यावर माहिती देताना सांगितले की, एव्हरेस्ट सर करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापासून मे महिन्याच्या अखेरीपर्यंतचा वेळ उत्तम समजला जातो. मात्र यावेळी फणी वादळाचा परिणाम होऊन हा उत्तम काळ केवळ तीन आठवड्यांवर आला. त्याचा फायदा एकाचवेळी घेण्याच्या प्रयत्नांत नेपाळच्या बाजूने २७२, तर चीन-तिबेटच्या बाजूने १२५ असे ३९७ गिर्यारोहक आणि त्यांच्यासोबतच तेवढे शेर्पा यांनी एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रॅफिक जाम झाले. एव्हरेस्टवरील गिर्यारोहण हा नेपाळमधील आता मोठा व्यवसाय झाला असून या वर्षी नेपाळ पर्यटन खात्याच्या आकडेवारी नुसार ३८१ परवाने देण्यात आले आहेत ज्याचे प्रत्येकी शुल्क ११००० अमेरिकन डॉलर एवढे आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट