Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता मिळणार इतक्या लाखांचे अर्थसहाय्य

sudhir mungantiwar
, गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:33 IST)
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणाऱ्या १५ लाख रूपये अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करत ही रक्‍कम २० लाख रुपये इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला.
 
राज्याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांचे वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन सन 2019-20 या वर्षी 47, 2020-21 ला 80 आणि 2021-22 ला 86 इतकी मनुष्यहानी झाली आहे.
 
मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटूंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल, लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणाऱ्या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्‍यात आली असून यापुढे १५ लक्ष ऐवजी २० लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. २० लाखापैकी १० लाख रुपये देय असलेल्‍या व्‍यक्‍तीला तत्‍काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्‍कम रूपये १० लाख त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणाऱ्या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम अर्थात फिक्‍स डिपॉझीट जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
 
व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास रू. ५ लाख तर व्‍यक्‍ती गंभीररित्‍या जखमी झाल्‍यास रू. १ लाख २५ हजार इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खाजगी रूग्‍णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा २० हजार रू. प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.
 
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या ६० हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून ती ७० हजार रू. इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या १० हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून १५ हजार रू. इतकी वाढ करण्‍यात आली आहे.
 
गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी १२ हजार इतकी रक्‍कम वाढवून १५ हजार रू. करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी ४ हजार रू. ची रक्‍कम ५००० रू. इतकी करण्‍यात आली आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात होणारी मनुष्‍यहानी व त्‍यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्‍या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्‍वपूर्ण मानला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात दोन घटना