मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.
कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते. घटनेच्या वेळी बारमध्ये एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती, असे समजते. आग नेमकी कशामुळे आग लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
कमला मिल कंपाऊंडमध्ये मराठी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे तसेच खासगी कंपन्यांचे कार्यालय आहे. कंपाऊंडमध्ये अंदाजे ४२ रेस्टॉरंट आणि पब आहेत. या आगीचा फटका काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांनाही बसला आहे.