Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का आपल्या पायावर "हार्दिक" मारुन घेतलात?

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (10:46 IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक राजकीय गुणांपैकी सर्वोत्तम गुण म्हणजे त्यांनी कधीही कुणाची जात पाहिली नाही. कधीही जातीचं राजकारण केलं नाही. हे आता सांगण्याची गरज पडली कारण हार्दिक आणि उद्धवजींच्या मनोमीलनाचे वृत्त सध्या झळकत आहे. हार्दिक पटेल हा एका जातीचा नेता आहे. तो लोकनेता नाही. बरं त्याला नेता म्हणण्या इतकं त्याने काही केलेलं देखील नाही. ही त्याच्या राजकीय करिअरची सुरुवात आहे. या शर्यतीत तो कितपत टिकेल हा प्रश्न उरतोच. असो. तर हार्दिक-उद्धवजींच्या भेटी नंतर उद्धवजींची पत्रकार परिषद झाली. शिवसेनेने गुजरात निवडणूक लढली तर हार्दिक पटेल हा शिवसेनेचा चेहरा असेल, असे वक्तव्य उद्धवजींनी केले. हार्दिकनेही शिवसेना आणि बाळासाहेबांचे कौतुक केले. आता शिवसैनिक आणि उद्धवजींना ही खेळी फार मोलाची वाटत आहे. मुंबईत जवळ जवळ २२% मराठी माणूस उरलाय. त्यात सगळेच काही शिवसेनेला मतदान करणार नाही. मग शिवसेनेला जर आपला बालेकिल्ला अर्थात मुंबई टिकवायची असेल तर काहीतरी वेगळी खेळी खेळावी लागेल. ही वेगळी खेळी किंवा मास्टरस्ट्रोक म्हणजे हार्दिक पटेल. शिवसेना गुजरातची निवडणूक लढेल तेव्हा लढेल, पण सध्या पालिकेची निवडणूक तोंडावर आहे. म्हणून हार्दिकची अचानक एंट्री झाली आहे. हार्दिकच्या एंट्रीने गुजराती मतदाते अर्थात मुंबईतील पटेल समाज शिवसेनेकडे आकृष्ट होईल, असे त्यांना वाटत असेल. तरी हार्दिक हा केवळ चर्चा करण्या इतकाच मोठा आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. एखाद्याला जर आपटायचं असेल तर त्याला आधी उचलावं लागतं, असं म्हणतात. सध्या हार्दिकला सर्वांनी उचललंय. तो कधी आपटला जाईल, हे पाहावं लागेल. 
 
दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी हार्दिकचा वापर करण्यात आला असेल, तर भाजप विरोधात कॉंग्रेसने कन्हैयाला स्टार बनवले होते. पण भाजपवर त्याचा अधिक परिणाम झाला नाही. सुरुवातीला बिथरुन भाजपच्या नेत्यांनी कन्हैयावर तोंडसुख घेतले पण वरुन आदेश आल्यावर कन्हैयाचा विषय भाजपच्या नेत्यांनी बाजूला ठेवला. भाजपच्या विरोधात प्रचारासाठी अशा तरुण मंडळींना हाताशी घेण्याचा कॉंग्रेसने प्रयत्न केला आहे. आता हा डाव उद्धवजी खेळू पाहत आहेत. पण उद्धवजींनी कॉंग्रेसच्याही पुढचं पाऊल टाकलं आहे, कारण हार्दिक हा त्यांना शिवसेनेचा गुजरातमधील चेहरा वाटतो. हार्दिकच्या एंट्रीमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये सोशल वॉर सुरु आहे. हार्दिकमुळे काहींना करिअप्पा आठवत आहेत, तर शिवसैनिक पवारांच्या नावाने भाजपला टोमणे मारत आहेत, तर भाजपाई हार्दिकच्या नावाने शिवसेनेवर शब्द सुख घेत आहेत. असो. 
 
शिवसेनेची जडणघडण जातीच्या आधारावर कधीच झाली नाही. नंतर हिंदू हा मुद्दा बाळासाहेबांनी उचलून धरला, तो यशस्वीही झाला. पण शिवसेनेचा गाभा मराठीच आहे. शिवसेनेने मराठी तरुणाला व्यक्त व्हायला भाग पाडलं. त्याला चीड व्यक्त करायला लावली, ती परप्रांतीयांच्या विरोधात. पण मराठी तरुण म्हणजे जो आक्रमक आहे तोच. ज्याला रस्त्यावर उतरुन राग व्यक्त करण्यात समाधान वाटतं, तोच. पण राग व्यक्त केल्याने मनचं समाधान होतं, समस्येचं समाधान होत नाही, असं ज्या मराठी तरुणांना वाटतं ते शिवसेनेपासून दूर राहिले. याआधी अमराठी विरुद्ध मराठी असे अनेक खटके शिवसेनेने उडवले आहेत. त्यात मद्रासी, कानडी, उत्तर भारतीय आणि गुजराती सुद्धा आले. हिंदूत्वाचा मुद्दा घेतल्यामुळे अनेक अमराठी भाषिकांच्या मनात बाळासाहेबांविषयी नितांत आदर आहे. माझे अमराठी कलाकार मित्र, जे भारताच्या विविध ठिकाणाहून मुंबईत आलेत, त्यांना मी स्वतः बोलताना ऐकलंय की "बंबई मे हिंदू सिर्फ बालासाहब की वजह से हैं". पण ते युतीचे मतदार होते, शिवसेनेचे नाही. आता बाळासाहेब नाहीत. आहे तो फक्त त्यांच्या विषयीचा आदर. तो आदर मतांमधून उतरेल असं वाटत नाही. उद्धवजींबद्दलही त्यांच्या मनात आदर असेल, पण बाळसाहेबांचे सुपुत्र म्हणून, उद्धव ठाकरे म्हणून नव्हे. पण विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत नसले तरी महाराष्ट्रीय जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. आता हार्दिकला आणून शिवसेनेला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? हिंदूत्व, मराठी अस्मिता आणि आता गुजराती अस्मिता, पटेल अस्मिता की जातीयवाद? नेमका शिवसेनेचा अजेंडा काय आहे, हा मराठी जनांसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे. या खेळीमुळे मराठी माणसाला दिलासा मिळाला नसून मराठी माणूस गोंधळून गेला आहे. त्याला या क्षणी गोंधळून टाकण्याची गरज नव्हती. अनेक शिवसैनिक किंवा समर्थक या खेळीची स्तुती करीत असले तरी याचे परिणाम फारसे चांगले दिसून येणार नाही. मुळात ज्या पक्षाला देशभरात विस्तार करायचा आहे, त्या पक्षाला प्रांतवाद सांभाळून चालत नाही. कोणती तरी एक तटस्थ भूमिका घ्यावीच लागेल. शिवसेनेने उत्तर प्रदेशची निवडणूक सुद्धा लढवली आहे. तो शिवसेनेचा हिंदुत्ववादी चेहरा आहे. पण गुजरातचं काय? पटेल समाजा पुरता मर्यादित असणार्‍या हार्दिक पटेलला सोबत घेऊन शिवसेनेला नेमकं काय साधायचं आहे? असा प्रश्न मराठी माणसाला पडला आहे. पटेल कार्ड पालिकेच्या निवडणूकीत ओपन करुन उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केली आहे. कारण यामुळे काही पटेल समाजाची मतं मिळतील. पण पारंपारिक मराठी मतदारांचं काय? तसेही सामनामधून गुजराती समाजावर टीका करण्यात आली होती, हे गुजराती समाज विसरणार नाही आणि हार्दिकच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा गुजराती समाज मोदींच्या बाजूने उभा राहील. हार्दिकला ऐन निवडणूकीच्या तोंडावर बोलवून शिवसेनेने मराठी माणसाला दुखावले आहे. त्यात हार्दिक गुजरातमधील शिवसेनेचा चेहरा असेल असे म्हणत जातीयवादी राजकारणात पहिले पाऊल टाकले आहे. बाळासाहेबांनी मराठी ते हिंदूत्व अशी मोठी मजल मारली होती. उद्धवजींनी ती आता संकुचित करत, हिंदुत्व ते जातीयवाद अशी अधोगती स्वीकारली आहे. हार्दिकला आपला चेहरा घोषित करुन उद्धवजींनी बाळासाहेबांच्या मेहनतीवर पाणी ओतले आहे. कारण जो बाळासाहेबांचा गुण होता, तोच आता शिवसेनेच्या राजकारणातून नष्ट झाला आहे. बाळासाहेबांनी जातीयवाद पोसला नाही, सहनही केला नाही, आता उद्धवजींनी जातीयवादाला शिवसेनेचा चेहरा म्हणून घोषित करत शिवसेनेच्या पारंपारिक मराठी आणि हिंदू मतदाराला दुखावले आहे. आता शिवसैनिकांना पटे किंवा न पटेल पण त्यांना मराठी अस्मितेसोबत पटेल अस्मिता सांभाळावी लागणार आहे.
 
ही खेळी उद्धवजींनी स्वतः खेळली असेल किंवा त्यांच्या खास सल्लागारांनी त्यांना तसे सांगितले असेल, नुकसान शिवसेनेलाच सहन करावे लागणार आहे. हार्दिक केवळ भेटायला आला असता तर ठीक होते. पण हार्दिक हा शिवसेनेचा गुजरातचा चेहरा असेल, असे म्हणणे हे शिवसेनेला घातक ठरणार आहे. कारण बलाढ्य मोदींसमोर हार्दिकची गणना होऊ शकत नाही. त्यात मोदींना संपूर्ण भारताने बहुमताने निवडून दिले आहे. कॉंग्रेस जे करु शकली नाही, ते मोदी करतील असा बहुसंख्य देशवासीयांना विश्वास आहे. या विश्वासाला अजून तरी तडा गेलेला नाही. त्या मोदींच्या विरोधात उद्धवजींना लढावसं वाटतं आणि लढताना बाळबोध हार्दिकला महत्वाचा सोबत घ्यावसं वाटतं, हे आश्चर्यजनक आहे. त्यात आदित्य ठाकरेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलंय की "hardikbhai and uddhav ji discussed their respective views on fight against social injustice and the way forward". म्हणजे सामाजिक अन्यायाविरोधात लढण्यासाठी शिवसेनेला आता हार्दिकची गरज भासणार आहे. पण सामाजिक अन्याय म्हणजे काय? हे हार्दिकला माहित आहे का? पटेल समाजावर होणारे अन्याय म्हणजे सामाजिक अन्याय असे हार्दिकला वाटते व आता ते शिवसेनेलाही वाटत आहे. हार्दिकला सोबत घेऊन यात फायदा हार्दिकचा आहे, शिवसेनेचा नाही. शिवसेना ही परिपक्व संघटना आहे. हार्दिक नुकताच राजकारणात उतरलाय. तेही संकुचित उद्देश घेऊन. उद्या गुजरातचं भाजप सरकार, पटेल समाजाला हवं ते देऊन हार्दिकला बाजूला करु शकते. एका लहान मुलासमोर गुडघे टेकायला मोदी काय कच्चे खेळाडू नाहीत आनी उद्धवजींना सुद्धा अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे. उद्धवजी आधीच आक्रमक भाषण करीत आहेत. तसे त्यांनी विधानसभेच्या वेळी सुद्धा केले होते आणि मोठा भाऊ छोटा झाला, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मुळात उद्धवजींनी मोदींच्या विरोधात इतका आक्रमक पवित्रा का घेतला आहे, हे एक कोडच आहे. मोदी तर उद्धवजींना अनुल्लेखाने मारत आहेत. स्मारकाच्या भूमीपूजनाच्या दिवशी तर मोदींनी औपचारिकता म्हणून उद्धवजींकडे पाहिले, नाहीतर त्यांनी अक्षरशः उद्धवजींना टाळले. केवळ टीका न करता अनुल्लेखाने मारता येते हे ठाकरे का समजून घेत नाहीत? बाळासाहेब भाषणात अनेकांची थट्टा करायचे, शिव्याही घालायचे. पण महाराष्ट्राने तो अधिकार त्यांना दिला होता, तो अधिकार उद्धवजींना अजून महाराष्ट्रीय जनतेने दिलेला नाही. त्यात मराठी माणसाला पटणार नाही असा पटेल त्यांनी शिवसेनेच्या डोक्यावर मारलाय. आता मराठी माणसाला प्रश्न पडलाय की एवढी बलाढ्य शिवसेना, तिला कालच्या पोराची गरज का भासते, ती इतकी की हाच आपला गुजरातमधील चेहरा आणि ऐन पालिकेच्या निवडणूकीच्या वेळी? मग कुठे आहे मराठी अस्मिता? कागदावर? की फक्त ओठांवर? आज शिवसेनेने हार्दिकचे हार्दिक स्वागत केले आहे. पण स्वतःचे हार्दिक अभिनंदन करुन घेण्याची संधी त्यांनी गमावली आहे. उद्धवजींची ही खेळी कामी येईल की नाही हे २१ तारखेनंतर कळेलच. पण मला तरी वाटतंय उद्धजींनी आपल्या पायावर हार्दिक मारुन घ्यायला नको होता, त्यापेक्षा धोंडा परवडला असता. 
 
जयेश शत्रुघ्न मेस्त्री 

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments