काल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पुलाचा भाग कोसळला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन आहिर यांनी जी. टी. रुग्णालयात जाऊन जखमींचा विचारपूस केली. या वेळी - जयंत पाटील म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाचे कळाले. ऑडिट करताना वरवर काम केल्यामुळे ही घटना घडली आहे.
मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली, पण त्याने काही होत नाही. जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करून घ्यावे. अपघातानंतर महापालिका आणि रेल्वेने जबाबदारीची टोलवाटोलवी केली. मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. भाजपाने शिवसेनेला जाब विचारायला हवा. पण शिवसेनेचे पक्षाध्यक्ष युती करण्यातच गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यातच मग्न आहेत. म्हणूनच इथे यायला त्यांना वेळ झालेला नाही. मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले आहे. असे पाटील म्हणाले आहेत.