Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल
, शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (22:58 IST)
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता करत आपल्या फेसबुक अकाउंटवरून ती शेअर केली आहे. या कवितेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भाजपने महाराष्ट्रातील संचारबंदीला विरोध केल्यामुळे भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. या कवितेचं शीर्षक ‘खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ असं देऊन जितेंद्र आव्हाड यांनी ही कविता फेसबुकवर शेअर करताच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला.
 
जितेंद्र आव्हाड यांनी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे,’ अशी कविता सोशल मीडियावर टाकल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे. या कवितेमधून त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे, तसेच मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुकही केल्याचं दिसून आलं.
 
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
 
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…..
विरोधकांचे त्यामुळेच
फावले…….
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
 
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
 
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या….
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
 
ना कुठे बडबोले पणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको….
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिक पणे
तो करतो आहे…..
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
 
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
गोर गरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!
 
ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडे वारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
 
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठ सूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय…..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
 
अशा आशयाची कविता जितेंद्र आव्हाड यांनी शेअर करताच ती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी मात्र या कवितेकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. कारण, यामध्ये आव्हाडांनी  विशेष शैलित विरोधकांवर टीका केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुंभ आणि कोरोना:'हरिद्वारची परिस्थिती पाहून मी देवाच्या भरवशावर सगळं काही सोडून दिलं'