Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काजवा महोत्सवच आता काजव्यांच्या मुळावर उठलाय का?

Webdunia
- प्रवीण ठाकरे
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या भंडारदरा धरण आणि कळसूबाई शिखर परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी असंख्य काजवे परिसरात लुकलुक करतात.
 
त्यामुळं महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक भंडारदरा परिसरात येत असतात. यावर्षी जूनच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी अहमदनगर मधील हरिश्चंद्र गड ते काळसुबाई शिखर दरम्यानच्या भागात काजवा महोत्सव साजरा झाला, पण शनिवारी, 3 जून रोजी रात्री काजवा महोत्सव बघून रविवारी सांधन दरीत पर्यटनासाठी गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पावसामुळे दरीत अडकले, आणि काजवा महोत्सवाविषयी चर्चा सुरू झाली.
 
काय आहे काजवा महोत्सव?
वळवाच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजवांच्या मिलनाचा उत्सव सुरू होते. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली आहे, असं चित्र बघायला मिळतं.
 
शहरी नागरिकांना निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक पर्यटन संस्थांनी काजवा महोत्सवांचं आयोजन केलं आहे.
 
त्यात महाराष्ट्र पर्यटन विभागाने 3 आणि 4 जूनला भंडारदरा वनपरिक्षेत्रातील पांजरे गावात काजवे बघण्याबरोबरच आदिवासी लोकनृत्याचंही आयोजन केलं होतं.
 
नाशिक वन-वन्यजीव विभागाने घालून दिलेले नियम अभयारण्य क्षेत्रात कडक पालन करावे, जेणेकरून काजव्यांचा प्रजननकाळ धोक्यात येणार नाही. पर्यटकांनी त्यांची वाहनं पार्किंगमध्येच उभी करावी. काजवे ज्या झाडावर लुकलुकत असतील, त्या झाडापासून 50 फूट अंतर राखावे, असं आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
 
यावेळी मोबाइल टॉर्च, एलईडी किंवा अन्य बॅटरीचा झोत झाडांवर टाकू नये. कुठलीही गाणी, वाहनांचे हॉर्न वाजवून गोंगाट, गोंधळ करू नये, असं सागंण्यात आलं आहे.
 
नियमांचं उल्लंघन करताना आढळून आल्यास वन आणि पोलिस विभागांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, त्यासाठी पर्यटक स्वतः जबाबदार असतील, असं उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
 
मात्र या काजवा महोत्सवाला पर्यावरण प्रेमींकडून विरोध करण्यात आला आहे. काजवा महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांकडून निसर्गाचे नुकसान होत असल्याचे पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे.
 
त्यामुळे हा महोत्सव रद्द करावा, यावर बंदी घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण त्याआधी आपण काजवा समजून घेऊया.
 
असा असतो काजवा...
काजवा हा कणा नसलेला म्हणजेच अपृष्ठवंशीय गटातील कीटक. काजवे निशाचर असल्याने रात्रीच सक्रिय होतात.
 
नर काजव्यांच्या पाठीवर दिव्यांप्रमाणे लुकलुकणारा प्रकाश बघायला मिळतो. जैविक कचरा विघटन, परागीभवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
 
हा काजवा वर्षभर पालापाचोळा आणि झाडांच्या खोडावर राहत असतो. वळीव पावसानंतर हा काजवा बाहेर येण्यास सुरुवात करतो.
 
काजव्याला सहा पाय आणि पंखांच्या दोन जोड्या असतात. तो हवेत उडू शकतो.
 
काजव्याच्या जीवन चक्राचे मुख्यत्वे तीन विभाग असतात. अंडी, अळी, कोश असा फुलपाखरासारखा जीवनमान असते.
 
या काजव्याचे दोन आठवड्यात प्रवर रूपांतर होतं. प्रौढ झाल्यानंतर काजवा स्वयंप्रकाशित बनतो. हा काजवा दिरडा, बेरडा, जांभूळ या झाडावरच बसत असतो.
 
काजवा का चमकतो?
काजवाच्या शेपटीत एक अवयव असतो. त्यामध्ये लूसीपीरियल नावाचं केमिकल तयार होतं. या केमिकलची ऑक्सिजनची विक्रिया झाली की, त्यामधून प्रकाश बाहेर पडतो. त्याला आपण काजव्यांची चमकणे म्हणतो.
 
काजवे प्रकाशाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. फक्त काजवेच नाहीत तर इतरही काही प्राणी आणि कीटक एकमेकांशी प्रकाशाद्वारे संवाद साधतात. तो संवाद कशासाठी तर एकतर मिलनासाठी किंवा दुसरा भक्षक आला तर त्याच्यासाठी.
 
मादीला आकर्षित करण्यासाठी नर काजवे प्रकाश सोडतात, ज्याचा प्रकाश जास्त तो नर मादी निवडते. त्यामुळे नर एकमेकांशी प्रकाशाद्वारे स्पर्धा करतात.
 
प्रकाशाच्या रंगावरून मादीला आपल्या जातीतील नर ओळखता येतो. आपला जोडीदार निवडीच स्वातंत्र्य हे मादीला असतं.
 
काजव्यांच्या जगभरात दोन हजार जाती आहेत. यापैकी सात ते आठ जाती भारतात आढळतात.
 
काजव्यांचा कीटकांच्या कॉलियोपटेरा कुळात समावेश होतो.
 
दरवर्षी मे ते जूनच्या दरम्यान काजव्यांचा मिलनाचा कालावधी असतो. मिलनानंतर नर काही दिवसात मरून जातो तसंच मादी जमिनीखाली अंडी घालते आणि तीही मरून जाते.
 
तीन ते चार आठवड्यात अंड्यातून अळी बाहेर पडते. काजव्याच आयुष्य अंडी, अळी, प्रौढ या चक्रातून जात.
 
अंड्यातून अळी बाहेर पडली की वर्षभर काजवा याच स्थितीत राहातो. शेवटी काही दिवस प्रौढ होतो आणि चमकू लागतो.
 
साधारण पाणथळ जागी काजवे मोठ्या संख्येत वाढतात. साधारण असा समज आहे की काजवे जेव्हा जन्मतात तेव्हा चमकतात, पण तसं नाही ते जेव्हा प्रौढ होतात तेव्हाच चमकतात.
 
काजव्यांमुळे प्रकाशझोतात आलेले हरिश्चंद्र गड आणि कळसुबाई अभयारण्य...
साधारण 2004-05 च्या दरम्यान लोकसत्ताच्या सर्व आवृत्त्यांमध्ये अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड – कळसुबाई अभयारण्यातील झाडाभोवती असंख्य लुकलुकणाऱ्या काजव्यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता, त्यानंतर असंख्य निसर्गप्रेमी आणि कुतहुल म्हणून पर्यटकांनी आपला मोर्चा अकोलेतील अभयाराण्याकडे वळवला.
 
हा फोटो काढल होता अकोले येथील निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार नंदकूमार मंडलिक यांनी.
 
ते सांगतात, "मी खूप वर्षापासून सह्याद्रिच्या या भागात भटकंती करत आहे, साधारण 2003 ला मी एका झाडाभोवती एक प्रकाश खाली वर लयीत चमकताना बघितला, जणू कुणी विजेरी म्हणजे टॉर्चने तसं करत असावं, पण तो काजवे आणि त्यांचा प्रकाश खेळ होता, मी फोटो काढले, तेव्हा आता सारखे डिजिटल कॅमेरे नव्हते, मला हवे तसे फोटो मिळत नव्हते, मी 2 वर्षानंतर हवा तसा फोटो काढण्यात यशस्वी झालो."
 
"आपल्या परिसरात एवढी सुंदर निसर्गसंपदा आहे, या हेतूने मी तो फोटो लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यास दिला, तेव्हा काजवा महोत्सव वगैरे असले काही प्रकार नव्हते, पण निसर्गप्रेमी आणि पर्यटक येण्यास सुरुवात झाली आणि ते वाढत गेले, तरुणाईचे प्रमाण जास्त आहे."
 
"आधी पर्यटन वाढले आणि तरुणांना रोजगार असं चित्र होतं, इथपर्यंत सर्व ठीक होतं, तुम्ही सपरिवार दोन तास यांचा आनंद घेवू शकत होता, आता मात्र बाजार झाला आहे. अनेक तरुण मुलांनी पर्यटकांना खुणावण्यासाठी मार्केटिंग सुरू केलं. राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था सुरू केली.
 
मात्र आमचं निरक्षण आहे की हुल्लडबाजी आणि मद्यपान वाढलं आहे. टेंटमध्ये जोडीदारांसामवेत तुम्ही राहू शकता, पण जंगलात असताना सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. एक कपल एका तंबूत असतं. अशावेळी एखादी अप्रिय घटना घडली तर जबाबदारी कुणाची असंही प्रश्न आहेच.
 
गावागावात आता पर्यटनाच्या नावाखाली फसवणूक सुरू झालीय, लोकांना आधीच कबूल करूनही जेवण दिलं जात नाही आशा तकरारी वाढल्या आहेत. काजवे असलेल्या झाडांपासून कमीत कमीत 5 ते 10 मीटर अंतर राखणं गरजेचं असतं, तुम्ही विजेरी किंवा गाडीचे दिवे लावू नये,पण काही हुल्लडबाज मात्र झाडाजवळ जाणं, फोटोसाठी झाड हलवणं, झाडावर दगड मारणं, मद्यपान करून गोंधळ घालणं अशा घटना इथे घडत आहेत."
 
"अशा हुल्लडबाज लोकांमुळे सपरिवार येणारे नागरिक किंवा निसर्गप्रेमी यांचा मात्र भ्रमनिरास होतोय, हुल्लडबाज पर्यटकांचे प्रमाण 80% वर गेलय. कोरोनानंतर आम्ही एक दिवस हा महोत्सव बंद करण्यात यशस्वीही झालो. यावर्षी मात्र महोत्सव होत आहे.
 
वनविभागच्या नियमानुसार रात्री 9 नंतर कुणालाही अभयारण्यात प्रवेश नसतो, वनखाते प्रवेश करताना प्रवेश फी घेतं, पण त्या व्यतिरक्त त्यांचा रोल नाही. अगदी 2-3 दिवसांपूर्वी अभयरण्यातून बाहेर येताना एका गाडीचा अपघात झाला ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नियमाप्रमाणे नऊ वाजेच्याआत बाहेर पडले असते तर हा मृत्यू झालाच नसता, वनविभागाने नियम घातलेत, आचारसंहिता आहे पण अंमलबजावणीसाठी यंत्रणा कमी पडत आहे."
 
अकोले राजुर येथील अभयारण्यात 1 वनपरिक्षेत्र अधिकारी, 3 वनपाल आणि 8 वनसंरक्षक अधिकारी आहे, त्यापैकी 1 पद रिक्त आहे.
 
वनपरीक्षेत्र अमोल आडे सांगतात, "जैव व्यवस्थेत, जैविक कचरा विघटन, परागीभवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अभयारण्यात दोन बाजूंनी प्रवेश दिला जातो, यासाठी आम्ही संरक्षक मंजुरांची संख्या वाढवली आहे, एकूण 80 मुलं आम्ही घेतली आहेत, जे गाडी पार्किंग करण्यापासून काजव्यांचा जागी घेऊन जाणे असे काम करत असतात."
 
"त्याव्यतिरिक्त स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून पर्यटकांची वाहनं नियंत्रित पद्धतीने सोडणे, अशा उपाययोजना करत आहोत, गावामध्ये टेंट सुविधा किंवा पर्यटन सुविधा देणाऱ्या लोकांची बैठक घेत त्यांना नियम सांगितले आहेत."
 
"त्याही पुढे आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आहे, या टीमने नुकतीच सांधन दरीत चांगली कामगिरी केली आहे. शनिवारी-रविवार पर्यटकांची खूप गर्दी असते, अशावेळी आम्ही राजुर येथील 1 वनपरिक्षेत्र अधिकारी, 4 वनपाल आणि इतर 10 कर्मचारी बोलावून घेतो, हुल्लडबाजी करणारे किंवा रात्रीच्या वेळी नियमंचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना आम्ही दंड करत असतो, सध्या परिस्थिति सामान्य आहे, काही वर्षापूर्वी हुल्लडबाजी खूप होती, आता मात्र 90% गोष्टींवर आम्ही नियंत्रण केलं आहे.
 
"कुठल्याही प्राण्याच्या आयुष्याचा हेतू हा जेनेटिक माहिती पुढच्या पिढीला देणे हा असतो. काजवे जेनेटिक माहिती पुढच्या पिढीला देतात आणि मरून जातात. त्यामुळे मे अखेरीस वा जून महिन्यात काजवांच्या प्रजजन काळ खूप महत्त्वाचा आहे, आता मात्र त्याठिकाणी तरुण तरुणी जातात, मद्यपान करतात, नाचगाणे, धिंगाणा घातला जातोय, जैवविविधतेत प्रत्येक किटकाचं स्थान महत्त्वाचं आहे, मानवी अस्तित्वामुळे प्रजननस्थळी खूप मोठा परिणाम होतोय, आपण बघितलं तर पहिले गावाकडे काजवे सहज दिसायचे, आता मात्र फक्त जंगलात दिसतात. अशावेळी आपण आशा महोत्सवास न जणेच योग्य आहे," अशी भूमिका निसर्गप्रेमी शेखर गायकवाड यांनी मांडली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पंचतत्त्वात विलीन, मोठ्या मुलीने केले अंत्यसंस्कार

मुंबईत भरधाव टेम्पोने पादचाऱ्यांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू, चार जखमी

नागपुरात एका गुन्हेगाराने मित्राची केली हत्या, पैशाच्या वादातून केला गुन्हा

नागपुरात एटीएस सक्रिय, बांगलादेशी घुसखोरांचा शोध सुरू

LIVE: महाविकास आघाडीची आज 'महारॅली'

पुढील लेख
Show comments