Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महात्मा फुलेंची मुलींसाठीची पहिली शाळा वर्षभरात बंद पडली; पुढे काय घडलं?

Webdunia
सोमवार, 1 जानेवारी 2024 (09:24 IST)
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती.
 
त्यांनी उचललेल्या या पावलामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशाच बदलली होती. पुण्यात ज्या ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आली होती आता तिथे एक स्मारक होणार आहे.
 
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ही शाळा कशी होती. त्यावेळची परिस्थिती नेमकी कशी होती हे सांगणारा हा लेख.
अहमदनगर येथून प्रकाशित होणाऱ्या 'ज्ञानोदय' या पत्रिकेतील हा उतारा पाहिला तर आपल्याला त्या काळातील परिस्थिती काय होती याची कल्पना येऊ शकेल.
 
'अतिशुद्रिकांस विद्या शिकविण्याविषयीची मंडळी, या मंडळाचे पुढारी जोतीराव गोविंद फुले आहेत. आणि अलीकडे जेव्हा या शाळेची परीक्षा झाली तेव्हा त्यांचे बोलणे लावले की 'महार, मांग, चांभार हे या देशात फार असून ते नीचावस्थेत आहेत हे पाहून इश्वराच्या प्रेरणेने माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की अश्यास सुशिक्षित करण्याविषयी काही उपाय योजावा.’
 
‘प्रथम मनात आले की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली आहे. म्हणून त्या लोकांच्या मुलींचीच शाळा प्रथम घालावी. असा विचार करिता मी एका मित्रासुद्धा अहमदनगरास जाऊन तेथे अमेरिकन मिशन खात्यातील फरार मडमोच्या कन्याशाळा पाहिल्या आणि पाहून मला मोठा आनंद झाला. कारण की, त्या चांगल्या रीतीने चालल्या होत्या.
 
मग मी पुण्यात परत येऊन लागलीच एक मुलींची शाळा घातली व तेथे वाचणे, लिहिणे, गणित, व्याकरण असा अभ्यास चालवला. परंतु अतिशुद्रांस शिकविण्यामुळे आमच्या जातवाल्यास फार वाईट वाटले व प्रत्यक्ष माझ्या बापाने देकील मला घरांतून घालविले.
 
तेव्हा निरुपायी होऊन आपल्या रक्षणाबद्दल काही काम केले पाहीजे असे प्राप्त झाले. आणि शाळाही बंद पडली. नंतर काही दिवसांनी आणखीन ती चालवावी म्हणून प्रयत्न केला. परंतु ते कठीण पडे. कारण कोणी जागा देईना व बांधावयास रुपये नव्हते व लोक आपली मुले पाठवायास इच्छिनात.'
 
महात्मा जोतीराव फुले यांनी भिडे वाड्यात सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे वर्णन महात्मा फुलेंच्या समग्र वाड्मयात सापडते ते असे.
 
12 सप्टेंबर 1953 चा 'ज्ञानोदय' मधला हा उतारा.
 
ज्या भिडे वाड्यात ही शाळा सुरू झाली, स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली तो भिडेवाडा शासनाने नुकताच ताब्यात घेतला आणि तो पाडून आता तिथे नव्याने या मुलींच्या पहिल्या शाळेचे स्मारक उभारले जाणार आहे.
 
पण ही पहिली शाळा नेमकी होती कशी?
सामाजिक कार्यकर्ते आणि मुलींच्या या पहिल्या शाळेचे स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्षं ज्यांनी प्रयत्न केले ते नितीन पवार सांगतात, "1847मध्ये सावित्रीबाई चौथी परीक्षा पास झाल्याची नोंद सापडते. त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेण्याचा आग्रह महात्मा फुल्यांनी धरला. या प्रक्रियेतूनच या दाम्पत्याने 1 जानेवारी 1848 ला तात्यासाहेब भिड्यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू केली.”
 
"पहिल्यांदा या शाळेत त्यांच्या मित्रपरिवाराच्या मुली शिकू लागल्या अशी नोंद आढळते. मुलींच्या शाळेच्या या प्रयोगामुळे अर्थातच सनातन्यांचे पित्त खवळले. पण शोषितांना खूप आनंद झाला. दस्ती नामक शाहिराचा त्यावेळच्या पोवाड्याचा एक संदर्भ मिळतो. त्या वर्णनात शाळेमध्ये ब्राम्हण, शेणवी, प्रभू जातीच्या मुली होत्या असा उल्लेख आढळतो.”
 
या पोवाड्याच्या ओळी आहेत
 
जोतीरावाची ऐका किर्ती. भिड्यांच्या वाड्यात
 
शाळेमध्ये मुली होत्या बहुत.. ब्राम्हण शेणवी प्रभुज्ञात!
भिडेंच्या वाड्यात दोन खोल्यांमध्ये ही शाळा चालत असल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर सांगतात.
 
फुल्यांच्या या शाळांमध्ये शिकवण्याचे विषय सुद्धा निश्चित होते.
 
बीबीसी मराठीशी बोलताना कुंभोजकर म्हणाल्या, “महात्मा फुले समग्र वाङमयात फुलेंच्या शाळेत कोणते विषय होते, कोणती पुस्तके वापरली जायची याचे उल्लेख आढळतात. भूगोल, इतिहास, गणित, व्याकरण हे विषय शिकवले जात होते. यासाठी काही त्यापूर्वी लिहिली गेलेली भारतीय तर काही इंग्रजी पुस्तके भाषांतर करुन वापरली जात होती. मुलींचा वेगळा आणि मुलांचा वेगळा असा फरक या अभ्यासक्रमात नव्हता. नंतर टिळकांनी विरोध करत मागणी केली होती की स्त्रियांना असा अभ्यासक्रम कशाला शिकवायचा."
 
ज्यांचा वाडा होता ते तात्याराव भिडे नेमके कोण होते ?
तात्याराव भिडेंच्या वाड्यात फुलेंची शाळा सुरू झाली असा उल्लेख आढळतो. पण हे भिडे नेमके कोण होते यांच्याबद्दल प्रा. कुंभोजकर सांगतात, “या वाड्याचे मालक म्हणजे शंकर रामचंद्र भिडे. भिडे कुलवृत्तांतमध्ये त्यांच्याबाबत माहिती मिळते. त्यानुसार हे भिडे पेशाने सावकार होते. पेशवाई बुडाली त्यानंतर राजाश्रय मिळण्यासाठी ते पटवर्धनांकडे गेले आणि तिथे कामाला लागले. त्यांना दोन पत्नी होत्या.
 
"त्यापैकी पहिली पत्नी आणि तिची मुले पुण्यात राहायची. शंकरराव भिडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही पत्नींच्या मुलांमध्ये प्रॉपर्टी वरुन वाद झाला. ते प्रकरण कोर्टात गेलं. त्या केस संदर्भातील कागदपत्रं उपलब्ध आहेत त्यात या भिडे कुटुंबाबद्दल माहिती मिळते. शंकरराव भिडे दत्तक होते अशीही माहिती मिळते."
 
त्याच ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आल्याचे प्रा. कुंबोजकर सांगतात.
 
तर नितीन पवार सांगतात, “तात्यासाहेब भिडे हे उदारमतवादी होते. महात्मा फुले यांचे ते स्नेही होते. त्यांच्या प्रशस्त वाड्यात ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं राहत असत. फुल्यांनी भिड्यांना मुलींची शाळा सुरू करण्याबाबत सांगितल्यावर त्यांना ती संकल्पना आवडली आणि त्यासाठी त्यांनी जागा तर दिलीच. पण त्याशिवाय सुरुवातीचा खर्च म्हणून 101 रुपयांची देणगीही दिली होती.”
 
सावित्रीबाईंचे शिक्षण
शाळा सुरू करण्यापुर्वी सावित्रीबाई फुलेंचे शिक्षण पूर्ण करण्यात आले. सुरुवातीला त्यांना ज्योतीराव फुल्यांनी शिकवल्याचा नोंदी आढळतात.
 
प्रा. कुंभोजकर सांगतात, “सुरुवातीचे शिक्षण झाल्यानंतर महात्मा फुले यांनी आपल्याच दोन सहकाऱ्यांना म्हणजे गोवंडे आणि भवाळकर यांना सावित्रीबाई फुलेंना पुढचे शिक्षण देण्याची जबाबदारी दिली.”
नितीन पवार सांगतात, “सावित्रीबाईंनी 1847मध्ये नॉर्मली स्कूलची चौथी परीक्षा पास झाल्याची नोंद सापडते. त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा असा आग्रह ज्योतिरावांनी धरला. सावित्रीबाईंनी त्यांच्या सहकारी सगुणाबाईंसह मिसेस मिचेल बाईंच्या नाॅर्मल स्कूलमध्ये मास्तरणीच्या धंद्याचे शिक्षण घेतले अशी नोंद कै. शास्त्री नारोबा बाजी महाघट पाटील यांच्या आत्मचरित्रात सापडते. या प्रक्रियेतूनच या दाम्पत्याने 1 जानेवारी 1848ला भिडे वाड्यात शाळा सुरू केली.”
 
या शाळेचे महत्त्व
फुलेंच्या नोंदीनुसार त्यांनी मॅडम फरार यांची अहमदनगर येथील कन्याशाळा पाहिली आणि त्यानंतर पुण्यात शाळा सुरू केली.
 
नितीन पवार सांगतात , "अहमदनगर मधल्या त्यांच्या मित्रांबरोबर फुले ही शाळा पहायला गेले होते. पण फरार यांची जी शाळा होती ती चालायची धर्मप्रसारासाठी. त्यामुळे अनेक जण आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवायला तयार नसत. सर्वसामान्य मुलींंपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हते. फुलेंच्या शाळेत सर्वांना प्रवेश होता. सर्वसामान्य स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे त्यांनी उघडली.”
 
त्याकाळी अगदी तुरळक स्त्रियांना आवश्यकतेनुसार शिक्षण दिलं जात असल्याचं प्रा. कुंभोजकर सांगतात. अहिल्यादेवी होळकर यांच्या सारख्या काही स्त्रियांचे शिक्षण झाल्याच्या नोंदी आढळतात. इतरांना मात्र शिक्षण खुलं नव्हतं.
 
पहिल्या शाळेनंतर पुढे
भिडे वाड्यातली पहिली शाळा वर्षभरातच बंद पडली. ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पण त्यानंतर शाळा सुरू करणे मात्र थांबले नाही.
 
ही शाळा बंद पडली त्यानंतर महात्मा फुलेंनी मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. फुलेंच्या समग्र वाङमयातील नोंदीनुसार मुलींच्या चौथीपर्यंतच्या तीन शाळा पुण्यात सुरू झाल्या होत्या.
 
पुना नेटिव्ह फिमेल स्कूल म्हणून त्या ओळखल्या जात. याच्या शाळांची परीक्षा झाली तेव्हा ती परीक्षा पाहण्यासाठी जवळपास 3 हजार जण जमल्याची नोंद आहे.
 
शनिवारी 12 फेब्रुवारीला पुना कॅालेज मध्ये ही परीक्षा पार पडली. त्या परीक्षेसाठी येणाऱ्या लोकांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा पाहण्यासाठी आलेल्या मंडळींमध्ये भारतीयांप्रमाणे युरोपियन लोक देखील होते.
 
आत जमलेल्या तीन एक हजार लोकांपेक्षाही जास्त गर्दी बाहेर झाली होती अशी नोंद आढळते. या परीक्षेनंतर उपस्थित लोकांना शाळेसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
या नोंदीनुसार शाळेतल्या मुलींना अभ्यासाला इसापच्या दंतकथा, ऋणनिषेधूक, मराठा इतिहास, व्याकरण, आशिया खंड आणि भारताच्या नकाशाशी परिचय, गणित, नितीबोधकथा, लिपिधारा आणि अक्षरे असा अभ्यासक्रम होता. पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग या शाळेत असल्याची नोंद आहे.
 
याबरोबरच महात्मा फुले यांनी 'पुना महार अँड मांग स्कुल्स' देखील स्थापन केल्या होत्या. या शाळेच्या समितीच्या अध्यक्षपदी सदाशिव बल्लाळ हे होते. तर ज्योतीराव फुले हे संस्थापक सदस्य होते.
 
मोरो विठ्ठ्ल, सखाराम यशवंत, वामन प्रभाकर असे अनेक जण विविध पदांवर होते अशी नोंद शाळा संबंधी कागदपत्रे मध्ये आहे. यातल्या पहिल्या शाळेत एकूण 106 विद्यार्थी शिकत होते, तर दुसऱ्या शाळेत ८३ विद्यार्थी होते. तर तिसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या होती 69.
 
या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक कोण होते याच्याही नोंदी आहेत. या शाळांमध्ये विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघो सखाराम, केस त्र्यंबक, विठोबा बिन बापूजी, विनायक गणेश, गणु शिवजी मांग, गणोजी बिन राजोजी असे शिक्षक होते. या शाळांमध्येही इसापनीती, निती दर्पण, मोडी वाचणे, व्याकरण, भुगोल, लिपिधारा,जनावरांचे वर्णन, आशियाचा नकाशा, गणित असे विषय शिकवले जात होते. मुलींच्या आणि मुलांच्या अभ्यासक्रमात फारसे वेगळेपण नसल्याची ही महत्त्वाची नोंददेखील सापडते.
 
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता राजभवनात पोहोचणार

LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार राजीनामा

मेहकरमध्ये दोन गटात हाणामारी, 23 जणांवर गुन्हा दाखल

नागपुरात नव्या सरकारच्या स्वागताची तयारी सुरू, उपराजधानी हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झाली

नागपूर मध्ये एका व्यक्तीने एका वृद्ध महिलेवर केला हल्ला

पुढील लेख
Show comments