महिला स्वावलंबी, त्यांना सन्मन मिळावा यासाठी बचत गट हे उत्तम माध्यम आहे. ही चळवळ म्हणून उदयास यावी. बचत गटांनी तयार केलेला माल विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मॉल उभे केले जातील अशी माहिती पालकमंत्री कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण, कामगार विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
लातूर महानगरपालिकेच्यावतीने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते २२१ बचत गटांना फिरत्या भांडवलाचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. प्रत्येक बचत गटास १० हजाराचे फिरते भाडवल देण्यात आले. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अंतर्गत शहरातील २२१ बचत गटांना उद्योगासाठी भांडवलाची गरज असते यामुळे केंद्र शासन व राज्य शासन या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा निर्धार सरकराने केल्याचे पालकमंत्री म्हणाले. यासाठी ०२ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आज करण्यात आले आणि शहरातील दुसर्या बचत गटांना पण अर्थसहाय्य केले जाणार आहे.
बचत गटांच्या उद्योगामधून जो माल तयार केला जाईल त्याच्या विक्रीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मॉल उभारले जातील असेही पालकमंत्र्यानी सांगितले. राज्यातील बचत गटांसाठी राज्य पातळीवर एक स्पर्धा घेतली जाणार त्याची सुरुवात लातूर जिल्ह्यातून केली जाणार असून ‘हिरकणी’ असे या स्पर्धेचे नाव असल्याचे सांगितले. फिरता निधी हा शुन्य टक्के व्याज दराने दिला गेला आहे. या कार्यक्रमात काही जणांना वैयक्तिक कर्जातून ऑटो रिक्षाही देण्यात आल्या. स्थायी समिती सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी महिलांना पाणी बचत करण्याचे अवाहन केले. याचसोबत नळाला तोट्या बसवण्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी खासदार सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, अतिरिक्त आयुक्त सतिष शिवणे यांच्यासह भाजपा नगरसेवक आणि बहूसंख्य महिला उपस्थित होत्या.