Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एडलवाईज कंपनीच्या स्पष्टिकरणानंतर मानसी नितीन देसाई यांचा खुलासा

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (22:36 IST)
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूमुळे देशभरात एकच खळबळ उडालीय.
महाराष्ट्राच्या विधानसभेतही पावसाळी अधिवेशनादरम्यान नितीन देसाईंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंचा मृतदेह आढळला.
 
लिखित सुसाईड नोट सापडली की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, नितीन देसाईंनी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली.
 
नितीन देसाईंवरील कोट्यवधींचं कर्ज आणि ते वसुलीसाठी तगादा, असं एक कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदारांच्या भाषणांमधील मुद्द्यांवरून समोर आलं.
 
भाजप आमदार आशिष शेलार यांनी तर, "एनडी स्टुडिओवर 180 कोटींचे कर्ज काढले होते. या 180 कोटींचे 252 कोटी झाले. या प्रकरणातून रसेश शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडलवाईज’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे" असं म्हणत थेट आरोप केले.
 
त्यामुळे नितीन देसाईंवरील कर्जाच्या ओझ्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाल्यानं, या चर्चांना दुजोरा मिळून, गंभीर वळण घेतलंय.
 
या आरोपांमध्ये ज्या कंपनीचं नाव सातत्यानं समोर येतंय, त्या एआरसी एडलवाईज कंपनीनं आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देणारं पत्रकही जारी केलंय. त्यानंतर नितीन देसाई यांची मुलगी मानसी हिने स्पष्टीकरण दिलं आहे.
 
नितीन देसाईंवरील आर्थिक कर्जाबाबत महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात काय चर्चा झाली, आतापर्यंत यासंबंधी कुणी कुणी काय आरोप केले आणि कंपनीनं आपल्या स्पष्टीकरणात काय म्हटलंय, हे सविस्तर आपण या बातमीतून जाणून घेऊ.
 
कर्जाच्या वसुलीचा मुद्दा शेलारांकडून उपस्थित
भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा सभागृहात नितीन देसाईंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. शेलारांनी यावेळी नितीन देसाईंवरील कर्जाच्या मुद्द्याला हात घातला.
 
यावेळी अधिवेशनात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन चंद्रकांत देसाई यांनी दुर्दैवीरित्या आपले जीवन संपवले.
 
“त्यांनी एनडी स्टुडिओवर 180 कोटींचे कर्ज काढले होते. या 180 कोटींचे 252 कोटी झाले. या प्रकरणातून रसेश शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडलवाईज’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
“त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा.”
 
'स्टुडिओवर जप्ती आली म्हणून मृत्यूला कवटाळले'
विधानसभा सभागृहात आशिष शेलारांनी नितीन देसाईंवरील कर्जाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दुसरीकडे, विधानपरिषदेत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. मात्र, यावेळी त्यांनी नितीन देसाईंवरील कर्जाचा आकडा सांगितलं.
 
प्रवीण दरेकर यांनी नितीन देसाईंसोबत आपल्या बैठकाही झाल्याचं नमूद केलं.
 
दरेकर म्हणाले, “माझ्या त्यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. या कलाकाराची आत्महत्या अशीच जाऊ द्यायची का? ते माझ्याकडे आले होते. त्यांचे कर्ज 150 कोटी होते. पण ते 250 कोटींवर गेले.
 
मागील 3 ते 4 महिन्यात माझ्या पाच ते 6 बैठका झाल्या. कर्जाची चौकशी झाली पाहिजे. व्याजावर व्याज लावले गेले. त्याच्या स्टुडिओवर जप्तीची प्रक्रिया आली म्हणून त्याने आज मृत्यूला कवटाळले.”
 
दरेकर पुढे म्हणाले की, "100 कोटीसाठी आपल्या मराठी तरुणाने मृत्यूला कवटाळले. त्याला नोटिसा कशा गेल्यात, त्याला कुणी प्रेशर केलं, याची चौकशी व्हायला हवी. मी राज्यातल्या मुख्यमंत्री यांना फोन केला. एक मराठी माणूस आहे, त्याने साम्राज्य उभं केलंय. राज्य सरकारने एनडी स्टुडिओवर ताबा घ्यावा, असे देसाईंनी रेकॉर्डमध्ये म्हटलं आहे.
 
"या सर्व लोकांची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. आत्महत्या ही चिंता करायला लावणारी आहे. कुठली फायनान्स कंपनी आहे ते बघायला हवे. नितीन देसाई यांचा स्टुडिओ पाडू नये, सरकारने तो आपल्या ताब्यात घ्यावा."
 
'एका हिंदी कलाकारामुळे काम मिळत नव्हतं'
 
दुसरीकडे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत एनडी स्टुडिओ सरकराने ताब्यात घेण्याची आणि नितीन देसाई यांनी त्रास देणाऱ्या हिंदी फिल्म कलाकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
 
प्रसाद लाड म्हणाले, “नितीन कलाकार होताच. तो माझा जुना मित्र आणि माझा नातेवाईकदेखील होता. आपण पाहिलं असेल गिरणगावात मोठा झालेला एक मुलगा एवढे भव्यदिव्य सेट उभे करतो. सातत्याने तो माझ्या संपर्कात होता. भाई जगताप, त्यांच्या मुलीच्या लग्नात आपण देखील आला होतात. आठ-नऊ महिन्यांपूर्वी तो डिप्रेशनमध्ये गेला होता.
 
"एडलवाईजचं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. इंस्टिट्यूटचं कर्ज होतं. पण ते कर्ज रिकव्हर करताना कशा पद्धतीत मानसिक तणाव द्यायला पाहिजे याविषयावरदेखील सरकारने एक भूमिका त्यांची देखील जाणून घेतली पाहिजे. सचिनभाऊंनी जो प्रस्ताव ठेवला, NCLT मध्ये असलेलं कर्ज राज्य सरकारने फिल्मसिटीच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कशी येईल आणि रामोजी फिल्मसिटीसारखी एखादी फिल्म सिटी नितीनच्या नावाने कशी उभी करता येईल त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत.”
 
चौकशीची मागणी करताना लाड म्हणाले, “नितीन देसाई यांच्या 11 ऑडिओक्लिप पैकी शेवटच्या 2 क्लिपची चौकशी झाली पाहिजे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की एका हिंदी फिल्म कलाकाराबरोबर झालेल्या वादामुळे मला काम मिळत नव्हतं. हा फिल्म कलाकार कोण होता जो मराठी माणसांवर अन्याय करत होता? फिल्मसिटीमधला दहशतवाद थांबला पाहिजे. त्यावरसुद्धा सरकराने विचार केला पाहिजे.”
 
“सरकारने एजलवाईज आणि हा फिल्म कलाकार कोण याची चौकशी करावी, तसंच एनडी स्टुडिओ त्यांच्या कुटुंबियांना विश्वासत घेऊन ताब्यात घ्यावा ही मी सरकारला विनंती करतो.”
 
चौकशी करण्याचं फडणवीसांचं आश्वासन
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या मुद्द्याला उत्तर दिलं.
 
फडणवीस म्हणाले, “नितीन देसाई एक महत्त्वाचं नाव होतं. ज्या प्रकारे त्यांनी बस्तान बसवलं त्याचा मराठी माणसाला अभिमान होता. अनेक राजकीय पक्षांचे कार्यक्रम व्हायचे त्याची थीम ठरवायला बोलवायचे.अनेक ठिकाणी प्रकल्पांमध्ये नितीन देसाई पूर्ण करायचे. दिल्लीतील चित्ररथ आपण तयार करायचो.
 
मा. पंतप्रधान साहेबांनी जे घाट सुंदर केले त्यासंदर्भात नितीन देसाईंचा सहभाग आहे. त्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. काही कर्ज झालं होतं. स्टुडिओ गहाण होता. एनसीएलटीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला. तरी ते प्रयत्न करत होते."
 
कुठेही जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे दबाव तयार करण्यात आला का याची चौकशी सरकार करतील. कायदेशीर बाबी तपासून त्यांची आठवण म्हणून त्याचं संवर्धन करता येईल त्यासंदर्भातील कायदेशीर बाब तपासून पाहू,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
ND स्टुडिओवर जप्तीची कारवाई होणार होती?
नितीन देसाई सध्या आर्थिक अडचणीत होते आणि त्यांच्या कर्जतमधल्या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची शक्यता होती. असं वृत्त काही दिवसांपूर्वीच रायगडमधील दैनिक कृषीवलने दिलं होतं.
 
नितीन देसाई यांनी काही सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
 
2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या.
 
काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज एडलवाईज ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसूल होत नव्हती. आता ते कर्ज 249 कोटी रुपयांवर गेलं होतं, असं वृत्तात म्हटलं आहे.
 
रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यानुसार, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या जप्तीबाबत अद्याप निर्णय दिला नव्हतं.
 
नितीन देसाईंच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांनी एडलवाईज कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 
4 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
एडलवाईज कंपनीचे पदाधिकारी आणि इतर 5 जणांविरोधात देसाईंच्या पत्नी नेहा देसाईंनी तक्रार केलीय.
 
"कर्ज प्रकरणांमध्ये नितीन देसाई यांना वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्याच मानसिक त्रासाला कंटाळून देसाई यांनी आत्महत्या केली," अशी तक्रार नेहा देसाईंनी केल्याचं रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
 
त्यांनतर खालापूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात 269/2023, 304, 34 या भारतीय दंड संहितांच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करणार आहेत.
 
नितीन देसाई प्रकरणावर एडलवाईज कंपनीचं स्पष्टीकरण
दरम्यान एआरसी एडेलवाईज कंपनीने त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एडेलवेस एआरसीचे कंपनी सेक्रेटरी तरुण खुराणा यांच्या डिजिटल स्वाक्षरीनिशी हे स्पष्टीकरणाचं पत्रक जारी केलंय.
 
प्रसारमाध्यमांमध्ये एडलवाईज एआरसी कंपनीबाबत बातम्या येत असल्यानं स्पष्टीकरण काढत असल्याचं पत्रकाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे.

एडलवाईज एआरसी कंपनीचं स्पष्टीकरण :
 
"नितीन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी 2016 आणि 2018 मध्ये आम्ही आर्थिक साहाय्य केलं होतं. पण 2020 पासून त्यांच्या कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते सर्व फोल ठरले. शेवटी 2022मध्ये हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडे (NCLT) गेलं.
 
"RBIच्या नियमांनुसार एडलवाईज एआरसीने सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही कोणतंही काम केलं नाही. त्यांच्यावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले नाही किंवा ते वसूल करण्यासाठी दबाव टाकला नाही. आम्ही केवळ कायदेशीर मार्ग अवलंबवला आहे.
 
"सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली तर त्याचा आदर करत त्यांना पूर्ण सहकार्य करू."
 
मानसी देसाई काय म्हणाल्या?
मानसी नितीन देसाई यांनी देसाई कुटुंबातर्फे एएनआय वृत्तसंस्थेसमोर बाजू मांडली. '181 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यातले 86.31 कोटीचे कर्ज फेडले होते. तसेच कंपनीने 6 महिन्यांचे व्याज आगाऊ मागितले होते. तेसुद्धा माझ्या बाबांनी त्यांचे ऑफिस विकून दिले होते. त्यांचा कोणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. कबूल केलेले सर्व पैसे ते देणार होते. कोरोना लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग ठप्प झालं होतं. स्टुडिओही बंद झाला. त्यामुळे त्यांना नियमित पैसे देता आले नाहीत आणि काही पैसे देता आले नाहीत. नंतरही त्यांनी कंपनीला भेटायचा प्रयत्न केला आणि व्याजाचे पुनर्गठन, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कंपनीनं त्यांना खोट्या पद्धतीने आश्वस्त केले आणि कायदेशीर कारवाई सुरू केली.'
 
माझ्या वडिलांची बदनामी होईल अशी खोटी माहिती पसरवू नये, कोणतीही माहिती देण्याआधी आमच्याशी संपर्क साधा. महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालावं, त्यांच्या इच्छेनुसार स्टुडिओ ताब्यात घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा.
 
एडलवाईज एआरसी कंपनी काय आहे?
'एडलवाईज एआरसी' ही एक वित्तीय साहाय्य करणारी कंपनी आहे. 'एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड' असं या कंपनीचं नाव असून, ग्राहकांना गरजेनुसार आर्थिक साहाय्य करते.
 
या कंपनीचे एकूण 12 लाख ग्राहक आहेत, तर 11 हजार कर्मचाऱ्यांसहित देशातील सर्व मोठ्या शहारांत ही कंपनी कार्यरत असल्याचं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
 
या कंपनीचे मुख्यालय मुंबईतील कलिना येथे आहे. रसेश शाह हे एडलवाईज समुहाचे चेअरमन आणि सीईओ आहेत.
 
एडलवाईजची स्थापना 1995 मध्ये रसेश शाह आणि वेंकट रामास्वामी यांनी केली आहे.
 
देशभरात अनेक ठिकाणी या कंपनीचे ऑफिसेस आहेत. या शिवाय अमेरिका, हाँगकॉंग, युके सिंगापूर, दुबई मॉरिशस इथेही ही कंपनी कार्यरत असल्याचं त्यांच्या वेबासाईटवर नमूद केलं आहं.
 
ही कंपनी होम लोन्स, व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. तसंच मालमत्ता व्यवस्थापन (म्युच्युअल फंड आणि पर्यायी मालमत्ता), मालमत्ता पुनर्रचना, विमा या क्षेत्रातही काम करते.
 
एडलवाईज एआरसी ही एडलवाईड ग्रुपमधील कमी आहे. या ग्रुपचं तुम्ही नाव अनेकदा ऐकलंही असेल, कारण या ग्रुपनं अनेक खेळांना स्पॉन्सरही केलं आहे.
 
कोण होते नितीन देसाई?
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म दापोली झाला होता. कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता असा त्यांचा प्रवास होता. अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
 
लगान (2001), देवदास (2002), जोधा अकबर (2008), प्रेम रतन धन पायो (2015) या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते.
 
त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते.
 
त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आशुतोष गोवारीकर, विधु विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होतं.
 
त्यांनी कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
 
2005 मध्ये त्यांनी कर्जतला एनडी स्टुडिओ सुरू केला होता.
 
भव्यदिव्य सेट, अनोखं कला दिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख होती.
 
मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा ते साकारायचे.
 
 











Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यात रुग्णालयात रुग्णाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्रात दारू विकत घेण्यासाठी वयाची अट किती ? आबकारी नियम माहित काय म्हणतात

3 पुर्‍या एकत्र खाल्ल्याने मृत्यू ! डाक्टर देखील हैराण

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर फेकला मोबाईल, चेहऱ्यावर जखमा

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

पुढील लेख
Show comments