Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैद्यकीय महाविद्यालये- रुग्णालयांनी सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता

वैद्यकीय महाविद्यालये- रुग्णालयांनी सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता
, सोमवार, 12 एप्रिल 2021 (18:21 IST)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा  विस्तार करण्याची आवश्यकता आहे.  रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामुग्रीची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी आज दिली. 
 
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे तसे आयुर्वेद महाविद्यालयांचे अधिष्ठाता या बैठकीला उपस्थित होते. 
 
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा
कोरोना१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असतील त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे. रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 
 
ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुलभता आणा
सध्या ऑक्सिजनचे १०० टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित ठेवण्यात आले आहे.  त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे योग्य नियोजन केल्यास ऑक्सिजन पुरवठ्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या. व्हेंटिलेटरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्राकडे राज्य शासन मागणी करीत आहे, व्हेंटिलेटरची कमतरता भरून काढण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
रुग्णांची लवकर चाचणी आणि ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचना
मृत अवस्थेत येणारे कोविड रूग्ण आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विहित केलेल्या आदर्श कार्यपद्धती (एसओपी) चे पालन करण्याची आवश्यकता आहे. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण उशिराने ८ दिवसानंतर रुग्णालयात दाखल झाला तर नंतर तो दगावतो, त्यासाठी अगोदरच चाचणी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या. 
 
कोविडकाळात बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याचे निर्देश
कोविडचे रुग्ण वाढत आहेत त्याचा रुग्णालयांवर ताण वाढत असून मनुष्यबळाची कमतरता पाहता हा ताण भरून काढण्यासाठी कोविडकाळात रिक्तपदे बाह्य स्त्रोताद्वारे भरती करण्यात येत्णार असून तशा जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय सेवेतून अलिकडेच निवृत्त झालेले डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ यांना तीन महिन्यासाठी कोविड काळात नेमणूक करता येणे शक्य असून त्यासर्व बाबी तपासून कार्यवाही करा, त्यामुळे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 
 
आयुर्वेद महाविद्यालयांच्या सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्या
आयुष संचालनालयाच्या शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांनी कोविडच्या या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. या महाविद्यालयांचा उपयोग जिल्हा प्रशासनाने करून घेण्यासाठी तेथील सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या. प्राध्यापक, विद्यार्थी हे सर्व हेल्थ वर्कर्स; या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन
 
ज्या संस्था शासनाची मानके पूर्ण करीत असतील त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी करून घ्या. वैद्यकीय शिक्षण संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर्स हे सर्व हेल्थ वर्कर्स असून या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले. वैद्यकीय शिक्षण विभागाची महाविद्यालये, रुग्णालये यांच्या सुविधा आणि सुरू असलेल्या कामाची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्हा प्रशासनाला अधिष्ठात्यांनी देण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या. 
 
रेमडेसिवीरच्या वापरात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा
राज्यात रेमडेसेवीरचा मोठ्या संख्येने पुरवठा सुरू होईल, भारताबाहेर निर्यातबंदी असल्याने त्याचा निश्चितच फायदा होईल, मात्र रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी यावेळी दिले. 
आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार; खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड लढ्यात सहभागी करून घ्या जी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत नाहीत त्यांना कोविडच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. देशमुख यांनी दिले.  
 
रेमडेसिवीर आणि इतर साधनांच्या माहितीसाठी राज्यस्तरीय डॅशबोर्ड तयार करा
रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदी अत्यावश्यक साधन सामुग्रीच्या माहितीसाठी राज्याचा एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात यावा, जेणेकरून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना संपूर्ण माहिती या डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळेल आणि त्यानुसार नियोजन करण्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने डॅशबोर्ड तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही श्री. अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या. 
 
ज्या जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञ, एमबीबीएस डॉक्टर्स किंवा इतर मनुष्यबळ बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्याची मागणी होत आहे, त्या सर्व जिल्ह्यांना शासनस्तरावरून स्वयंस्पष्ट सूचना द्या, काही अडचणी उद्भवल्यास अधिष्ठात्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अधिष्ठात्यांशी चर्चा करून विभाग तसेच जिल्ह्यातील कोविड स्थिती, अडचणी आणि उपाययोजनांची स्थिती वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर