शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेची याचिकेवर आज 6 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी आता तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
या प्रकरणी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाची मागणी मान्य करत सुनावणीची तारीख वाढवली
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात एकूण 14 प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची प्रकरण सातव्या क्रमांकावर होते. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यात आली. गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्यासह 41 आमदारांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप या आमदारांनी जबाब दाखल केला नाही.
अजित पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, राष्ट्रवादीच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ द्यावा. आणि तशी विनंती न्यायालयाने मान्य केली असून अजित पवार गटाच्या आमदारांना जबाब नोंदवण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. सुनावणी पुढे ढकलताना न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकिलांना फटकारले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबतचा निर्णय सुनावताना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटातील कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्यांच्या या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवर देशाचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे