धुळवडीच्या निमित्ताने मनसेकडून उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या एका भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यावर “बुरा ना मानो, होली है”अशी कॅप्शन देखील लिहिली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मनसेनं उद्धव ठाकरेंना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिल्याचं बोललं जात आहे.
या व्हिडीओमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रचारसभेत व्यासपीठावरून भाषण करताना दिसत आहेत. हा जुना व्हिडीओ वाटत असला, तरी नेमका कधीचा किंवा कोणत्या निवडणुकांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे, याविषयी निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. एका वृत्तवाहिनीचा हा व्हिडीओ असून त्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना एक विशिष्ट उपकरण देण्याचं आश्वासन देताना दिसत आहेत.
अनेक ठिकाणी विहिरीला पाणी असतं, पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी पिकाला देऊ शकत नाहीत. मला सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवलं आहे. वीज तर देईनच. पण जोपर्यंत वीज देता येणार नाही, तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईन. ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल. त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा कृषीपंप चालवू शकेल. वीज नसताना देखील तुम्ही तुमच्या पिकाला त्या पंपाच्या माध्यमातून पाणी देऊ शकाल”, असं उद्धव ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.