आज मुंबई विद्यापीठाच्या परिसरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणा देत 'बोंब मारो' आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अनेक परीक्षांचे निकाल रखडले आहेत. उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याचा प्रयोग यशस्वी ठरला नाही. त्यामुळे निकाल वेळेत लावणे शक्य झाले नाही. निकालांबाबत विद्यार्थी आणि पालकही अतिशय संवेदनशील असतात. या प्रकारात कुलपतींना लक्ष घालावे लागले. या साऱ्या प्रकाराला विद्यापीठाचा प्रमुख म्हणून कुलगुरू उत्तरदायी असले, तरी केवळ तेच याच्याशी संबंधित नसतात. विद्यापीठातील परीक्षा विभाग हा त्यातील मुख्य घटक आहे. या सर्व परीक्षांचे वेळापत्रक तयार करणे, त्यानुसार विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयांत परीक्षा घेणे आणि नंतर वेळेत म्हणजे ४५ दिवसांत निकाल लावणे आवश्यक असते. हे सर्व प्रकार विद्यापीठांत नित्यनेमाने होत असल्याने त्याची यंत्रणा तयार असते. काळानुरूप परीक्षांच्या स्वरूपात किंवा तपासण्याच्या पद्धतीत बदल केला तरच त्याचा परिणाम होऊ शकतो. मुंबई विद्यापीठात सध्या तसेच काहीसे होत असावे. मात्र, त्याचा परिणाम विपरीत असेल, तर त्यावर विचाराची गरज आहे, असे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मटाले यांनी सांगितले.