मटण पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून खून करून पसार झालेल्या आरोपीला सासवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. भगवान मारकड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निरंजन साहनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोरकर वस्ती परिसरात नऊ जुलै रोजी भगवान मारकड यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. सासवड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती.
भगवान मारकड हा एका टायरच्या दुकानात रोज मजुरीची काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. पोलिसांनी या विषयी अधिक चौकशी केली असता आरोपी निरंजन सहानी आणि दोघे एकत्र दारू पीत होते. निरंजन साहनी याच परिसरात फर्निचरची कामे करत होता. तसेच गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. त्यानंतर पोलिसांनी निरंजन साहनी याचा शोध सुरू केला असता तो नेपाळ येथील त्याच्या घरी गेला असल्याचे समजले. त्यानंतर सासवड पोलिसांच्या एका पथकाने तांत्रिक तपास करीत नेपाळ बॉर्डर वरून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली.
घटनेच्या दिवशी दोघांनीही निरंजन सहानी त्याच्या घरी दारू पार्टी केली. पार्टी सुरू असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि निरंजन याने रागाच्या भरात लाकडी दांडक्याने भगवान मारकडच्या डोक्यात मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह ओळख कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी नाल्यामध्ये फेकून दिला आणि त्याच रात्री मोटरसायकलने नेपाळला निघून गेला होता. सासवड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.