गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरातील अनेक भागात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील चौघांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. मंगळवारी सकाळी चौघे दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात आढळला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती कळताच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी लागलीच 4 संशयितांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे. मयत ज्ञानेश्वर याला दुचाकीवर बसवून चौघे घेऊन गेल्यानंतर काही वेळाने त्याचे कुटुंबीय तक्रार नोंदविण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी 24 तास झाल्याशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, तुम्ही परिसरात त्याचा शोध घ्या असे उत्तर दिल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी धाव घेतली असून मयताच्या नातेवाईकांशी चर्चा सुरू आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor