उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना नाशिकमध्येही तापमान चाळीशीकडे झुकते आहे.
उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत.सोमवारी (ता. २८) कमाल ३९.४, तर किमान तापमान २०.४ अंश नोंदविले गेले.
गत काही दिवस तापमानात सतत वाढ होत आहे. मार्चच्या अखेरीस तापमान चाळीशीकडे झुकल्याने दिवसभर नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाले होते, मात्र उष्णता वाढली होती. आता पुन्हा तापमान वाढत असून नाशिककर तापले आहेत.
किमान तापमान २४ अंशांच्या वर गेले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विक्रेते हिरव्या नेट चा वापर करताना दिसत आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी टोपी, स्कार्फचा वापर करताना दिसून येत आहे. उन्हाची काहिली वाढल्याने नागरिकांनी शीतपेयांना पसंती दिली आहे. ठिकठिकाणी शीतपेये विक्रेते दाखल झाले आहेत. एप्रिलमध्ये उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील कमाल तापमान: सोमवार – ३९.४, रविवार – ३८.८, शनिवार – ३७.५, शुक्रवार – ३७.२