मध्यवर्ती कारागृहात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला असून, कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कारागृहात बंदी असलेल्या फाशीच्या कैद्यांसह नऊ जणांना करोनाची बाधा झाली आहे. यात एका तुरुंग रक्षकाचाही समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वीच कारागृहात करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी २० कैद्यांना लस देण्यात आली. कैद्यांचे लसीकरण सुरू असतानाच एका कैद्याची प्रकृती खालावली. त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी आणखी सात कैद्यांची प्रकृती खालवली. त्यांचीही तपासणी करण्यात आली. सर्व करोनाबाधित असल्याचा अहवाल आला. याशिवाय एक अधिकारीही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
रविवारी या सर्वांना उपचारासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कारागृहातीलच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. करोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये फाशीची शिक्षा झालेले तीन, मोक्का व एमपीडीएचा प्रत्येकी एक व तीन कच्च्या कैद्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
यापूर्वी कुख्यात अरुण गवळीसह २२ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कारागृहात सध्या २२०० कैदी आहेत.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात आज दिवसभरात ७ हजार २०१ नवे करोना बाधित रुग्णांचे निदान झाले, तर दिवसभरात एकूण ६३ मृत्यू झाल्याची नोंद जाली आहे. तसेच नागपुरात एकूण चाचण्या २६ हजार इतक्या झाल्या आहेत.