हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून ते पुढील तीन दिवस मुसळधार पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. यात पुढील पाच दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज गडचिरोली आणि उद्या चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान मुंबईत काही वेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. तर ठाणे, पालघरमध्येही आज पावसाची दमदार बॅडिंग सुरु आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसाच्या हजेरीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान शेतीच्या कामांना देखील सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सातारा, आणि कोल्हापूर भागातही पाऊस सुरु असून या सर्व ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.