स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचार काळासाठी मुख्यमंत्री पद सोडणार आसल्याची माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेवरून पर्रीकर यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे दिला जाणार आहे.
मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याने त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू असून, अमेरिकेतील उपचारानंतर 6 सप्टेंबर रोजी पर्रीकर परतले होते. आता मात्र प्रकृती साथ देत नसल्याने ते कामकाज करू शकत नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ते प्रशासनात पूर्ण क्षमतेनं लक्ष घालू शकत नाही असे असल्याने विरोधकांनी पूर्णवेळ काम करणारा सक्षम मुख्यमंत्री गोव्यासाठी द्यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेसने मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पर्रीकरांशी गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेनंतरच हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.