Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्रा चाळ : संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (12:17 IST)
संजय राऊत यांना 5 सप्टेंबर 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आलीय. विशेष PMLA कोर्टानं हा राऊतांची कोठडी वाढवली आहे. आज (22 ऑगस्ट) संजय राऊत यांची ईडीची तिसरी कोठडी संपली होती. यापूर्वी 4 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला त्यांची कोठडी वाढवण्यात आली होती. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत घरचं जेवण दिलं जाईल. जेलच्या डॅाक्टरकडून संजय राऊत यांची तपासणी केली जाईल, असं न्यायालयानं 8 ऑगस्टला म्हटलं आहे.
 
ईडीनं रिमांड कॉपीमध्ये काय म्हटलं होतं?
संजय राऊत यांनी प्रवीण राऊत, वाधवान यांच्यासोबत संगनमताने प्रकल्प पूर्ण न करता आर्थिक गैरव्यवहार करण्याचं षड्यंत्र रचलं.
2010 मध्ये वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्याकडून 55 लाख रुपयाचं असुरक्षित कर्ज घेतलं.
2011 मध्ये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या प्रवीण राऊत यांच्या कंपनीतील गुंतवणुकीसाठी मुद्दलाव्यतिरिक्त 37 लाख रूपये दिले गेले. त्यानंतर वर्षा राऊत यांना 14 लाख रूपये देण्यात आले.
संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांचा पत्राचाळ प्रकरणात सहभाग असल्याची माहिती नाही, असं जबाबात सांगितलं आहे. मात्र, 2012-13 पासून ते प्रवीण राऊतला ओळखतात असं ते सांगतात.
एक कोटी रुपयांची प्रॅापर्टी गैरमार्गाने कमावलेली नाही असा संजय राऊत यांनी ईडीला दिलेल्या जबाबात दावा केलाय
अवनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी स्थापन करताना वर्षा राऊत शिक्षिका आणि माधुरी राऊत (प्रवीण राऊतांच्या पत्नी) गृहिणी होत्या.
पत्राचाळ प्रकल्पातून येणारा पैसा ट्रान्स्फर करण्यासाठी संजय राऊत यांनी कंपनी स्थापन केली.
अवनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत 5 हजार 625 रुपयांची गुंतवणूक केल्याबद्दल वर्षा राऊत यांना 13 लाख 94 हजार रूपये मिळाले.
या गोष्टी आणि पुरावे पाहता संजय राऊत PMLA मनी लाँडरिंग कायद्याचं कलम 3 नुसार दोषी आहेत. ते चौकशीत सहकार्य करत नाहीत.
संजय राऊतांच्या रिमांडवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला.
 
ईडीच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद-
प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होता त्याला HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे.
अलिबागची जमिन याच पैशातून खरेदी करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात. थेट आर्थिक फायदा झालाय.
प्रविण राऊत फक्त नावाला होता. तो संजय राऊत यांच्यावतीनं सर्व व्यवहार करत होता.
मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले.
संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
रात्री 10.30 नंतर चौकशी करणार नाही
राऊतांच्या बचावात वकिलांचा युक्तिवाद -
संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का नाही कारवाई केली कारण ही कारवाई राजकीय हेतूनं करायची होती.
संजय राऊत हार्ट रुग्ण आहेत. त्यांच्याशी उशीरा चौकशी करू नये.
राऊतांची चौकशी सुरू असताना वकीलांना उपस्थित राहू द्या.
पत्राचाळीचे रहिवाशी काय म्हणतात?
पत्राचाळ प्रकरणी बीबीसी मराठीशी बोलताना येथील रहिवाशी म्हणाले, "कुणावरती कारवाई झाली, कोण आतमध्ये गेलं, कुणाला आतमध्ये ठेवलं, याच्याशी आम्हाला काहीच देणंघेणं नाहीये. माझ्या आधीच्या चार-पाच पीढ्या या राजकारणामध्ये भरडल्या गेल्यात. राजकारणाचा हेतू साध्य झाल्यावर पुन्हा त्याच त्याच गोष्टी होतात."
 
"त्यामुळे पत्राचाळीच्या रहिवाशांना राजकारणाशी देणंघेणं नाहीये. फक्त घर, भाडं, आम्हाला दिलेलं आश्वासन याच्याशीच देणंघेणं आहे. सरकार येतं, सरकार बदलतं. पुन्हा त्याच गोष्टी घडतात. या चक्रव्यूहात आम्ही अडकलोय," असंही ते म्हणाले.
 
संजय यांचा गुन्हा काय? - उद्धव ठाकरे
आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राऊत यांच्या भांडूपमधल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "संजय राऊंताचा मला अभिमान आहे. आजच्या राजकारणात बळाचा वापर चाललाय. दिवस फरतात हे लक्षात ठेवा. दिवस एकदा फिरले की तुमचं काय होईल याचा विचार भाजपनं करावा.
 
"संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? पत्रकार, शिवसैनिक आणि निर्भीड आहे. त्याला अटक केली आहे. मरण आली तरी शरण जाणार नाही, असं संजय म्हणाले."
 
"विरोधात बोललं तर त्याला अडकवायचं अशी देशात परिस्थिती निर्माण झालीय. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. काळ बदलला की तुम्ही लोकांशी जसे वागले, तसाच काळ तुमच्याशी बोलेल," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
आता पुढचं कोर्ट ठरवेल - फडणवीस
संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईविषयी बोलताना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोणतीही यंत्रणा पुराव्यानिशी काम करते. यात एजन्सीने कारवाई केलीय. आता पुढचं कोर्ट ठरवेल."
 
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, "ही अटक ईश्वराची ईच्छा होती. जसं कर्म तसं फळ मिळतं. जे काही केलं त्याची प्रायश्चित्त म्हणून ही अटक आहे. ही एका सामान्य राजकीय नेत्याला झालेली अटक आहे."
 
दरम्यान दुसरीकडे स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांचा कथित कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय.
 
ईडीच्या कार्यालयाबाहेर रविवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी म्हटलं की, मला अटक करणार आहेत आणि मी अटक करून घ्यायला जातोय.
 
"शिवसेनेला कमजोर करण्यासाठी ही कारवाई, संजय राऊत झुकेगा नहीं, शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय याचे पेढे वाटा, बेशरम लोक आहात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, शिवसेनेला झुकवण्यासाठी सुरू आहे. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे," असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
 
रविवारच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी एक ट्वीटही केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जो कधीच हार मानत नाही, त्या व्यक्तीला तुम्ही हरवू शकत नाही. झुकणार नाही.
 
दरम्यान, राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेत असताना बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी त्यांना अटक होणार का असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी म्हटलं की, हम लढेंगे.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू होती. राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला. मुंबईतील भांडुपमधील घरावर ईडीनं छापा मारला.
 
तब्बल 9 तास राऊत यांची चौकशी सुरू होती.
 
संजय राऊत यांना ईडीनं चौकशीनंतर ताब्यात घेतल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.
 
या कारवाईबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की "संजय राऊत यांची केवळ चौकशी होत आहे. कर नाही त्याला डर कशाला, रोज तेच सांगत होते की त्यांनी काही केलं नाही. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते होते," असं शिंदे यांनी म्हटले.
 
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.
 
"संजय राऊत यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी 'रोखठोक' लिहिलं, त्यात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे कारस्थान निर्लज्जपणे सुरू आहे," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
राजन विचारे यांच्या नेतृत्वात ठाणे येथून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला 'मातोश्री'वर आले होते. त्यांच्याशी बोलताना उद्धव यांनी संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती.
 
संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय प्रतिक्रिया
 
"माफिया कमिशनर संजय पांडे यांच्यानंतर आता माफिया नेता संजय राऊत यांना अटक झाली आहे आहे. पत्राचाळ घोटाळा, वसई नायगाव, अलिबाग मधील जमिनी, मुंबईमधील सदनिका आणि परदेश वाऱ्या या सगळयांचा जेव्हा हिशोब लागणारं, तेव्हा नक्कीच आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊत यांना मिळेल," असं ट्वीट भाजप नेते किरीट सौमय्या यांनी केलं आहे.
 
"ज्या प्रकारे आज संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनतर आता अनेक लोकांची नावं, अनेक कंपन्यांची नावं बाहेर येतील. त्याचे तार कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेले मिळतील. त्यामुळे येणाऱ्या काळात मातोश्रीमध्ये सुद्धा या सगळ्यांचे कनेक्शन दिसेल," अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
 
त्यांनी म्हटलं, "अनिल परब, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्या आघाडीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला, कमिशनखोरी झाली. त्यावर ईडीचे लक्ष होते. त्यातूनच आज ईडीने संजय राऊत यांना आज अटक केल्यांनतर अनेक चेहरे बाहेर येतील."
 
संजय राऊत यांचे ट्वीट्स
ज्यावेळी संजय राऊत यांच्या घरावर छापे पडले, तेव्हा त्यांनी छाप्यादरम्यानच ट्विटरवर ट्वीट्समागून ट्वीट्स पोस्ट केले.
 
पहिलं ट्वीट - 'तरीही शिवसेना सोडणार नाही.'
 
दुसरं ट्वीट - 'महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील.'
 
तिसरं ट्वीट - 'खोटी कारवाई.. खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र'
 
चौथा ट्वीट - 'कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.'
 
पाचवं ट्वीट - 'शिवसेना झिंदाबाद!!! लढत राहीन.'
 
या छाप्याचे वृत्त कळताच, संजय राऊत यांचे समर्थक घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. समर्थकांनी राऊतांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
 
संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर घोषणा देत आहेत.
 
राऊतांवरील कारवाईनं शिंदे गट आनंदी
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे संजय राऊतांवरील कारवाईबाबत म्हणाले की, "संजय राऊत हे हुशार नेते आहेत. त्यांना ईडी किंवा कसलीच भीती वाटत नाही. आपण जे करतो ते खरंय, असा आत्मविश्वास त्यांना आहे."
 
"शिवसैनिक आज आनंदी झाला असेल. ज्याच्या भोंग्यामुळे महाराष्ट्राला त्रास झाला, शिवसेनेचे 40 आमदार गेले, 12 खासदार गेले. संजय राऊत मास लिडर नाहीत, त्यामुळे उठाव होणार नाही," असंही शिरसाट म्हणाले.
 
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, "ईडीच्या कारवाईचं स्वागत करतो. संजय राऊतांना हिशेब तर द्यावाच लागेल. 1200 कोटींचा पत्राचाळ घोटाळा असो वा वसई-नायगाव बिल्डरचा घोटाळा असो वा, माफियागिरी असो वा दादागिरी असो, प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी, महाराष्ट्राला लुटण्याचा महाविकास आघाडीचा प्रकल्प होता... आता हिशेब तर द्यावाच लागणार. आज महाराष्ट्राची जनता आनंदी आहे. कारण माफिया संजय राऊतना पण हिशेब द्यावा लागणार."
 
पत्राचाळ प्रकरण काय आहे?
मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला.
 
म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला.
 
13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं.
 
पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1 हजार 34 कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली.
 
पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडा आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. EOW (Economic offence Wing) कडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे.
 
ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केलेले प्रवीण राऊत हे गुरुआशिष बांधकाम कंपनीचे माजी संचालक आहेत.
 
पत्राचाळ सिद्धार्थ नगर गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि पत्रकार पंकज दळवी सांगतात, "आम्हाला अजूनही ही घरं मिळालेली नाहीत. दरम्यानच्या काळात गुरूआशिष कंपनी HDIL ने टेक ओव्हर केली. घरं बाधांयचं सोडून परस्पर इतर बिल्डरला जमिनी विकण्यात आल्या. या जागेवर काही प्रमाणात काम झालं असून जळपास 306 घरांची लॉटरही म्हाडाने काढली आहे."
 
"नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन झाले. रहिवासी म्हणून राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. पत्राचाळीचं काम सुरू व्हावं. 672 लोकांना घरं मिळावी," असंही ते म्हणाले.
 
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांच्यावर कारवाई का?
पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. 1 फेब्रुवाराला ईडीने सात ठिकाणी झडती घेतल्यानंतर 2 फेब्रुवारीला ईडीने प्रवीण राऊत यांना ताब्यात घेतलं.
 
ईडीने आपल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, प्रवीण राऊत यांच्या जमिनी, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि वर्षा राऊत,स्वप्ना पाटकर यांच्या अलिबाग येथील जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.
 
म्हाडाने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यात गुरुआशिष कंपनी, सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान यांचाही समावेश असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
 
प्रवीण राऊत, सारंग वाधवान आणि राकेश वाधवान गुरुआशिष कंपनीचे संचालक असताना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले म्हणून या तिघांविरोधात ईडीने तपास सुरू केला.
 
गुरूआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 त्रयस्त बिल्डरांना FSI विकला आणि त्यातून 901 कोटी रुपये कमवले. तसंच रहिवाशांची घरंही बांधली नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे.
 
गुरूआशिष कंपनीने त्यानंतर मिडोज नावाचाही प्रकल्प सुरू केला आणि ग्राहकांकडून 138 कोटी रुपये कमवले. या बांधकाम कंपनीने बेकायेदशीरपणे हा पैसा कमवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे आणि त्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
 
गुरुआशिष बांधकाम कंपनी दरम्यानच्याकाळात HDIL ने टेक ओव्हर केली. HDIL संस्थेच्या बँक खात्यातून प्रवीण राऊत यांच्या बँक खात्यात 100 कोटी रुपये ट्रांसफर झाल्याचंही ईडीने म्हटलं आहे.
 
हीच रक्कम नंतरच्या काळात प्रवीण राऊत यांनी आपले निकटवर्तीय, नातेवाईक, सहकारी यांच्या खात्यात वळवले आणि याच दरम्यान 2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 83 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी स्वीकारल्याचा दावा ईडीने केलाय. तसंच वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी या रकमेचा वापर केल्याचा दावाही ईडीने केला आहे.
 
ईडीने याची चौकशी सुरू केल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांना 55 लाख रुपये परत केल्याचंही निदर्शनास आलं आहे.
 
वर्षा राऊत यांच्या नावावर असलेले अलिबाग येथील 8 भूखंड सुद्धा जप्त केल्याचं ईडीने म्हटलं आहे.
 
प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.
 
'55 लाख रुपये परत केले?'
प्रवीण राऊत यांच्या पत्नी स्वप्ना राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2010 साली 55 लाख रुपये ट्रांसफर झाल्याचं ईडीने म्हटलं आहे. हेच 55 लाख संजय राऊत यांनी परत केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
ईडी कारवाई करणार हे संजय राऊत यांना माहिती होतं म्हणूनच त्यांनी प्रवीण राऊत यांना 55 लाख रुपये परत केले असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
 
"55 लाख परत केले याचा अर्थ संजय राऊत यांनी चोरीची कबुली केली आहे."असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
 
"संजय राऊत यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारात संजय राऊत यांचे आर्थिक पार्टनर प्रवीण राऊत यांनी घोटाळा केला. याप्रकरणात संजय राऊत यांनी मदत केली असावी, सहकार्य केले असावे असे दिसते. ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीला 55 लाख रुपये परत केले होते. ईडी आणि सोमय्या खोटं बोलत होते तर संजय राऊत यांनी 55 लाख परत का केले? 55 लाख चेकने परत केले मग कॅश किती मिळाले असतील?" असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
 
ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. संजय राऊत प्रकरणातही ईडीने आता इथेच थांबू नये, त्यांचे विमान तिकीट, हॉटेल बिल्स अशा सर्व गोष्टींची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
 
नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्रातील सरकारने कितीही दबाव आणला तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करतील असंही यावेळी सोमय्या म्हणाले.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

5 मोठी कारणे, एक्झिट पोलच्या निकालात भाजप आघाडीवर का ? जाणून घ्या

गिरीराज सिंह यांचा मोठा दावा, यावेळी महाराष्ट्र-झारखंडमध्ये डबल इंजिनचे सरकार येणार

पुण्यात मतदानाचा नवा विक्रम, एवढ्या टक्क्यांनी मतदान वाढले

यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू

पालघरमध्ये कारखान्यात लागली भीषण आग, व्हिडीओ वायरल

पुढील लेख
Show comments