शरद पवारांनी अलीकडच्या काळात त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटी, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मांडीला मांडी लावून लावलेली हजेरी, पुण्यातला पुरस्कार सोहळा आणि पत्रकारांशी बोलताना केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत नाही असं अजिबात म्हणता येणार नाही.
ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून शरद पवार आणि अजित पवारांच्या सततच्या भेटींवर टीका करण्यात आलीय.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर चर्चा केल्याचं राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याविषयी बोलताना सांगितलं की, "मी याबाबत आधीच भाकीत केलं होतं की एक टीम पुढे रवाना झालीय आणि दुसरी टीमही लवकरच होईल. 2014 पासून हे सगळं चाललं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी 'चोरडिया' नावाच्या माणसाचं घर सापडतं यातच सगळं आलं."
शरद पवारांची स्पष्टीकरणं, संजय राऊत वारंवार करत असलेले आरोप आणि त्यातच येत्या 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली इंडिया आघाडीची बैठक यामुळे सध्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.
तुम्ही नातीगोती सांभाळत असाल तर कार्यकर्त्यांनी का भांडावं?
"पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे आणि कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. श्री. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही," अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलीय.
अजित पवार आणि शरद पवार यांची शनिवारी 12 ऑगस्ट रोजी पुण्यात एक गुप्त भेट झाली. अशा भेटींमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याचं या अग्रलेखातून सांगण्यात आलंय.
"उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे."
शरद पवारांनी मात्र या भेटीबाबत बोलतांना सांगितलं की, "ते माझे पुतणे आहेत. माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे? कुटुंबातील कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीला कुटुंबातील इतर सदस्यांना भेटायचे असेल तर त्यात कोणतीही अडचण नसावी."
यासोबतच ते हेदेखील म्हणाले की, काही हितचिंतक त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांचा पक्ष भाजपसोबत जाणार नाहीत.
शरद पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी टीका करताना असं म्हटलं की, "ते तुमचे पुतणे असू शकतात, तुम्ही नातीगोती सांभाळत असाल तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एकमेकांना का भांडायचं? हा प्रश्नच आहे. शिवसेनेच्या डीएनएमध्ये अशा प्रकारचं ढोंग नाही."
सामनामध्ये आलेला अग्रलेख आणि संजय राऊतांचा शरद पवारांबाबतचा बदलेला सूर यावरून शरद पवारांच्या भूमिकेबाबत त्यांच्या मनात असणारी अस्वस्थता स्पष्ट होते.
'शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपावण्याचा प्रयत्न करतो'
अजित पवार आणि शरद पवार यांच्या पुण्यात झालेल्या भेटीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "कोणीही शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपावण्याचा प्रयत्न करतो आणि लढाई सुरू झाली की होणाराचं आहे.
"राजकारणात बेरजेचं राजकारण करायचं असतं, भागाकर आणि वजाबाकी होऊ नये,याचा प्रयत्न पक्षाच्या अध्यक्षांनी करायचा असतो. आतताईपणाने कोणती पावलं न टाकता, सामंजस्याने जर काही होत असेल तर प्रयत्न केला गेला पाहिजे.
जयंत पाटील असं म्हणत असले तरी त्यांच्या बंधूंना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती त्यांनीच माध्यमांना दिली होती.
माध्यमांनी संभ्रम निर्माण करू नये
शरद पवारांनी मात्र सोमवारी (14 ऑगस्ट) ला बारामतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, "मी वारंवार माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्या घटकांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. माध्यमांनी असे प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करू नये."
रविवारी (13 ऑगस्ट) ला सांगोला येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, "भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती राष्ट्रवादीच्या धोरणात बसत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझा पक्ष (राष्ट्रवादी) भाजपसोबत जाणार नसल्याचे मी स्पष्ट करत आहे. आमच्यापैकी काहींनी वेगळी भूमिका घेतली आहे. आता आमचे काही हितचिंतक आमच्या भूमिकेत काही बदल करता येईल का, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते सौहार्दपूर्ण चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत."
बंडानंतर एकूण चार वेळा भेटले आहेत काका-पुतणे
अजित पवारांनी मागच्या महिन्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांच्या एकूण चार भेटी घेतल्या आहेत. नुकतीच पुण्यात झालेली बहुचर्चित गुप्त बैठक सोडली तरी त्याआधीदेखील वेगवेगळी कारणं देऊन अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटी घेतल्या आहेत.
यापूर्वी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात या दोघांची भेट झाली होती. जुलैच्या मध्यात (15 ते 18 जुलै दरम्यान) या दोघांमध्ये तीन भेटी झाल्या होत्या. अजित पवार बंडानंतर सलग तीन वेळा शरद पवारांना भेटले होते.
या बैठकांच्या सत्रानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या की, “ही बैठकींची मालिका चुकीची आहे. शरद पवार यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी.”
शरद पवारांची भूमिका आधीपासून स्पष्ट मात्र कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच गोंधळ निर्माण झालाय
शरद पवारांच्या भूमिकेबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले की, "शरद पवारांची भूमिका ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. माध्यमांनी याबाबत केलेलं वार्तांकन पाहिलं तर नक्कीच संभ्रम निर्माण होतो मात्र पवारांच्या कृतीत यामध्ये कोणताही गोंधळ किंवा संभ्रम दिसून येत नाही."
"खरं म्हणजे 5 जुलैला झालेल्या सभेमध्येच शरद पवारांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्टपणे सांगितली होती. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असणारी त्यांची विचारधारा त्यांनी ठामपणे तिथे मांडली होती.
त्यानंतर बंगळुरूला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते एक दिवस उशिरा गेले त्यादरम्यान देखील अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यातली एक भेट ही त्यांत कौटुंबिक असल्याचं सांगण्यात आलं."
"पवार बंगळुरूला जाण्याआधी अजित पवारांनी त्यांच्या आमदारांसोबत घेतलेल्या भेटीमागे भाजपचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पवारांच्या भूमिकेबाबत राष्ट्रीय पातळीवर एक संभ्रम निर्माण करायचा तो एक प्रयत्न होता. शरद पवारांच्या राजकारणाबाबत अशी संभ्रमावस्था निर्माण करण्याचे प्रयत्न नेहमीच केले जातात बऱ्याचदा शरद पवारांच्या कृतीदेखील त्याला कारणीभूत असतात."
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र हजेरी लावलेल्या पुरस्कार सोहळ्याबाबत बोलताना विजय चोरमारे म्हणतात की, "पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या कार्यक्रमाचं नियोजनदेखील आधीच करण्यात आलेलं होतं. त्याची माहिती शरद पवारांनीच दिलेली होती. अर्थात पक्षफुटीनंतर शरद पवारांनी या कार्यक्रमात जायला हवं होतं की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो पण शरद पवारांच्या राजकारणाची पातळी पाहता त्यांना असे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे."
"निवडणूक आयोगाच्या प्रकरणाबाबतही असाच संभ्रम दिसून येतोय. अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेलादेखील नीट समजून घेता आलेलं नाही त्यामुळे त्यातही संभ्रम असण्याचं कारण नाहीये. कारण त्यांनी निवडणूक आयोगालाच अजित पवारांच्या दाव्याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे."
शरद पवारांची भूमिका स्पष्ट असली तरी अजित पवार गटाकडून शरद पवारांना भाजपसोबत नेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही चोरमारे म्हणतात. "अजित पवार यांच्या गटाकडून कधी जयंत पाटलांचा वापर करून तर कधी इतर कोणत्या मार्गाने शरद पवारांना भाजपसोबत जाण्याचा आग्रह मागच्या सहा महिन्यांपासून केला जातोय. सुमारे 48-50 आमदारांकडून हा प्रयत्न केला जातोय."
"पवारांची भूमिका स्पष्ट असली तरी या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही गटातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र नक्कीच संभ्रम निर्माण झालेला दिसून येतोय. कार्यकर्त्यांना पक्षात काय चाललंय आणि पुढे काय होणार याची काहीही कल्पना नाहीये असं दिसतंय."
शरद पवारांमुळे महाविकास महाविकास आघाडी तुटेल का?
शरद पवारांच्या राजकीय भूमिकेचा महाविकास आघाडीवर नेमका काय परिणाम होईल याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात की, "पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडी जर एकसंध राहिली असती तर बेरजेच्या राजकारणाचा महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता होती. खरंतर अजित पवारांच्या जाण्यामुळेच राज्यातील महाविकास आघाडीला धक्का बसलाय."
"या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटी आणि त्याबाबत असणाऱ्या बातम्यांमुळे महाविकास आघाडीवर निश्चितच परिणाम होईल. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातील चिंता अगदी साहजिकच आहे.
निवडणूक तोंडावर आलेली असताना महाविकास आघाडीतला महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काहीतरी होणं नक्कीच अडचणीचं असणार आहे."
"ही कौटुंबिक भेट असल्याचा बचावही अनेकांनी केलाय, पण जर ही कौटुंबिक भेट होती तर तिथे जयंत पाटील काय करत होते? हा प्रश्न यानिमित्तानं निर्माण होतो. मुंबईतल्या विरोधकांच्या राष्ट्रीय बैठकीपूर्वी या भेटी घडतायत त्यामुळे महाविकास आघाडीतलं चिंतेचं वातावरण समजू शकतो."
"आता शरद पवार राज्यभर दौरे करतील तेव्हा अर्थातच भाजपविरोधात बोलतील पण महाराष्ट्रासारख्या राज्यात या अशा घटनांमधून दिला जाणारा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. या भेटींमुळे लोकांच्या मनात नक्कीच संशय निर्माण झालेला आहे. आजकालच्या जगात केलेल्या सामान्य कृतीचेही अनेक अर्थ लावले जाऊ शकतात त्यात अशा भेटी वारंवार घडत असतील तर नक्कीच संभ्रम निर्माण होणार आहे. हा संभ्रम शरद पवार दूर करू शकतात का यावर महाविकास आघाडीचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असणार आहे."