गेल्या तीन वर्षांमध्ये महापालिका शाळांमध्ये कुपोषणाचे प्रमाण ३४ टक्के म्हणजे चौपटहून अधिक वाढले आहे. मलबार हिल, गोवंडी, सांताक्रूझ, चेंबूर, कुलाबा, ग्रॅण्ट रोड, अंधेरी येथील शाळांमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सकस आहारावर खर्च होणारे करोडो रुपये ही केवळ धूळफेक असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
प्रजा फाउंडेशन या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून पालिका शाळांचे हे वास्तव समोर आले. सन २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांमध्ये पालिका शाळेतील कुपोषित मुलांची आकडेवारी या संस्थेने मिळवली. यामध्ये २०१३ मध्ये पालिका शाळांमध्ये अंदाजे ३० हजार ४६१ मुले कुपोषित होती. हेच प्रमाण २०१५-१६ मध्ये तब्बल एक लाख ३० हजार ६८० वर पोहोचले आहे. म्हणजेच पालिका शाळेतील ३४ टक्के मुले कुपोषित आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.