Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर
, मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (08:47 IST)
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही दुष्काळ का जाहीर होत नाही, असा प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन अहिर  यांनी उपस्थित केला आहे. खरंतर केंद्राची समिती येऊन दुष्काळाचे पूर्वपरिणाम होणार नाहीत यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. दुष्काळ जाहीर न करणे हा संपूर्ण महाराष्ट्र व शेतकऱ्यांवर अन्याय आहे. याचा त्यांनी पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला. १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरकारला जाब विचारण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, वीज दरवाढ, पाणी कपात, अशा सगळ्याच गोष्टींबाबत राष्ट्रवादी सरकारला धारेवर धरणार.
 
पेट्रोल, डिझेलची दरवाढ अशाप्रकारे कमी करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. थोडे पैसे कमी करुन जास्त प्रमाणात दरवाढ करण्यात येते हे काम दुर्दैवाने सुरु आहे, असे मत अहिर यांनी व्यक्त केले. जनता बोलत नाही याचा अर्थ त्यांच्यात सहनशीलता आहे असा होत नाही. पुढच्या काळात याकरिता लोकांचा तीव्र विरोध व विशेषतः लोक रस्त्यावर उतरण्याची स्थिती संपूर्ण शहरात व राज्यात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. दुष्काळाच्या आढाव्यासाठी मंत्र्यांनी आधीच संपूर्ण राज्यात फिरणे गरजेचे होते. मात्र गेल्या दिवसात झालेल्या कॅबिनेटनंतर प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करण्याचे काम मंत्री करणार आहेत. याबाबतीत आमची अपेक्षा होती की दुष्काळ जाहीर करावा. परंतु नुसतेच आढावा घेण्याकरिता दौरे घेण्यात येत असतील ते बरोबर नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
मुंबईमध्ये पाणी माफिया निर्माण झाले आहेत. यांचे संगनमत फक्त मुंबई पालिकाच नाही तर काही राजकीय पुढाऱ्यांसोबतही आहे. हे आम्ही मागच्यावेळी हाऊसमध्ये सिध्द करण्याचा प्रयत्न केला होता. महापालिकेने याबाबतीत दक्षता घेतली असती तर आज लाखो लीटर पाणी जे चोरून विकण्याचे काम होत आहे त्यावर रोख बसून ते मुंबईकरांना उपलब्ध झाले असते, असे अहिर म्हणाले.
 
आगामी लोकसभा निवडणुकांबद्दल बोलताना ते म्हणालो की काँग्रेस पक्षासोबत युती करून मुंबई शहरात किमान दोन जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचबरोबर पक्षाच्या वतीने नेमण्यात आलेल्या सन्मन्वयकांमार्फत प्रत्येक तालुक्यात आढावा घेण्यात येणार आहे. अप्रत्यक्षपणे पक्षाची ताकद पाहून उमेदवारी लढण्याची भूमिका दोन्ही पक्षांची आहे. याकरिता दोन्ही पक्षामध्ये चर्चा सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 
आ. राम कदम यांना लोकप्रतिनिधी म्हणून कसे वागावे याकरिता शिकवणीची गरज आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की लोकांना अामीषे दाखवून त्यांचा भ्रष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे असे वाटते. परंतु आजचे मतदार इतके सुज्ञ झाले आहे की अशा भुलथापांना ते बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक