Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर आणि देशमुखांचे फडणवीसांवर नवे आरोप, राजकारण पुन्हा तापलं!

Webdunia
शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (15:44 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातायत.आता या प्रकरणात मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
 
अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी 100 कोटींचं खंडणी प्रकरण, 2021चं अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी सचिन वाझे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंना उपचारांसाठी रुग्णालयात आणलेलं असताना एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.
 
सचिन वाझे म्हणाले की, "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भातील पुरावे मी सीबीआयला सादर केले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे."
या आरोपानंतर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, "सचिन वाझेंमार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे."
 
सचिन वाझे नेमकं काय म्हणाले?
सचिन वाझे यांनी आरोप केला की, "जे काही घडलं, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले, सीबीआयकडे पुरावे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना एक पत्रही लिहिलं आहे. मी सगळे पुरावे सादर केले आहेत. मी त्या चाचणीसाठी (नार्को चाचणी) तयार आहे. मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव आहे."
 
जयंत पाटील यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाहीय. जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिाय दिल्यास, इथे अपडेट केलं जाईल.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याच्या आणि धमकीच्या आरोपाखाली सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगवास भोगत आहेत.
 
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील ते आरोपी आहेत. 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. या प्रकरणात ते गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत.
 
100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणात ते माफीचा साक्षीदार बनले आहेत. त्यानंतर तुरुंगामधून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटळून लावली होती.
 
अनिल देशमुख काय म्हणाले?
सचिन वाझेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावं, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता."
 
देशमुख म्हणाले की, "ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंनी माझ्यावर जे आरोप केले, ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे.”
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना अनिल देशमुख म्हणाले की, “मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझेंबद्दल हे स्पष्ट केलं होतं की, हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. आतापर्यंत दोन खूनाच्या गुन्ह्यात सचिन वाझेंना अटक करण्यात आली. आताही एका खूनाच्या गुन्ह्यात ते तुरुंगात आहे."
 
"सचिन वाझे हे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाहीत, असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मग अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताखाली धरुन देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावत आहेत. त्यामुळे मी जनतेला हे सांगू इच्छितो की मी जे आरोप फडणवीसांवर केले होते, त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले आहेत.”
 
सचिन वाझे कोण आहेत?
मुकेश अंबानी निवासस्थान स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
 
राज्यघटनेतील 311(2)(B) या तरतुदीनुसार त्यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली होती. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती.
 
त्याप्रकरणी API सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2021 रोजी पोलिसांना जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. . ही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता.
त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी NIA ला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. सचिन वाझेंचा पोलीस दलातील प्रवासही नाट्यमय असाच राहिला आहे.
 
मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे, अर्णब गोस्वामी प्रकरणी चर्चेत आलेले API सचिन वाझे आहेत तरी कोण? हे आपण जाणून घेऊया.
 
क्राइम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.
 
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
 
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
 
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
 
'सचिन हिंदूराव वाझे'
सचिन वाझे यांचं पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला.
 
वाझे यांना ओळखणारे वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सांगतात, "पोलीस दलात वाझे यांना पहिली पोस्टिंग मिळाली नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात. त्यानंतर 1992 च्या आसपास त्यांची बदली ठाण्यात झाली."
मुंबईत अंडरवर्ल्डने 1990 च्या दशकात डोकं वर काढण्यास सुरूवात केली. दाऊद, छोटा राजन आणि अरूण गवळी सारखे डॉन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपात करत होते. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडली.
 
मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या शार्प शूटर्सचं एक-एक करून एन्काउंटर करण्यास सुरूवात केली होती. सचिन वाझे त्याचसुमारास मुंबईत बदलीवर रुजू झाले होते.
 
सब इन्स्पेक्टर ते 'एन्काउंटर स्पेशालिस्ट'
वाझे यांची मुंबईत क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग झाली.
 
सचिन वाझेंची कारकिर्द जवळून पाहणारे पत्रकार नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देतात की, "मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर वाझेंनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केलं. त्यावेळी शर्मा अंधेरी क्राइम इंटेलिजन्स युनिटचे (CIU) प्रमुख होते."
 
क्राइम ब्रांचमधूनच त्यांचा सबइन्स्पेक्टर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा प्रवास सुरू झाला.
 
नाव न घेण्याच्या अटीवर ते पुढे सांगतात, "सचिन वाझे यांनी आत्तापर्यंत 60 पेक्षा जास्त अंडरवर्ल्डच्या गुंडांचा एन्काउंटर केला आहे."
 
मुन्ना नेपालीच्या एन्काउंटरमुळे सचिन वाझे मुंबई पोलीस दलात चर्चेत आल्याचं बोललं जातं. सचिन वाझे निलंबित होईपर्यंत मुंबई क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते.
सचिव वाझे क्राइम ब्रांचमध्ये असताना, डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूसला ताब्यात घेतलं होतं. पण, 2003 मध्ये ख्वाजा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.
 
पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. काही अधिकाऱ्यांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सचिन वाझे या अधिकाऱ्यांपैकीच एक होते.
 
ख्वाजा मृत्यू प्रकरणी मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.
 
पोलीस दलाचा राजीनामा आणि शिवसेना प्रवेश
सचिन वाझे यांनी पोलिस दलातून निलंबित झाल्यानंतर तीन वर्षांनी 2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा राजीनामा दिला. पण, सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही.
 
राजीनामा दिल्यानंतर एका वर्षात सचिन वाझे यांनी 2008 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.
 
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात. पण, काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमाला सचिन वाझे यांनी शिवसेना प्रवक्ते म्हणून हजेरी लावली असल्याची चर्चा आहे.
 
सचिन वाझे पोलीस दलात असताना क्राइम रिपोर्टिंग करणारे पत्रकार सांगतात, "सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलात 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओळख होती. मुंबईत सायबरक्राइम करणाऱ्यांवर कारवाई पहिल्यांदा सचिन वाझे यांनीच केली होती."
 
वाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांचे सहकारी 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओखळू लागले. सचिव वाझे यांनी मुंबईत 26/11 ला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यावर 'जिंकून हरलेली लढाई' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात भाजप अडचणीत, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती का?

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments