शेगांवच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांना सेवा करता येते, त्याचप्रमाणे योजना राबविण्याचा शिर्डीच्या साई संस्थानचा मानस आहे. साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणं आणि भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साईबाबा संस्थानला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यामुळे संस्थाननं हा निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी 21 सदस्यांच्या गटाची स्थापना करण्यात येणार असून, त्यातील एकाची या गटाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच शिर्डीत साईंची पालखी घेऊन येणाऱ्या इच्छूक साईभक्तांनी आपल्या नावांची नोंदणी या 21 सदस्यांकडे करायची आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षात सात दिवस साईभक्तांना साईंची सेवा करता येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकरचं मानधन मिळणार नाही. मात्र, त्या सर्वांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था साई संस्थानच्या वतीनं करण्यात येणार आहे. या योजनेमुळे साईबाबा समाधी शताब्दी वर्षात 10 हजार 500 साईभक्तांना सेवेची संधी मिळणार आहे.