Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र : 'प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा?'

sanjay raut
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (15:44 IST)
शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांनी तुरुंगातून आईला पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
पत्राचा मसुदा खालीलप्रमाणे...
 
प्रिय आई,
 
जय महाराष्ट्र!
 
खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज 'सामना'साठी अग्रलेख लिहित होतो, स्तंभ लिहित होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली.
 
आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहित आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आला.
 
रविवारी (१ ऑगस्ट) 'ईडी'चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस.
 
पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. 'लवकर परत ये' म्हणालीस.
 
खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज 'सामना'त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.
 
शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मराठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेईमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस.
 
मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात 'संजय' कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. 'ईडी', 'इन्कम टॅक्स' वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे.
 
माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे. माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी 'गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला.
 
अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले. प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?
 
आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल?
 
मी आताच ऐकले, 'नॅशनल हेराल्ड'प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.
 
जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुध्द बोलू नका, महाग पडेल. अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!
 
आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे,
 
शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुष्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही काय? भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय.
 
आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा "काहीतरी करा, शिवसेना वाचवा!" असे सांगणारी तूच होतीस. "हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?" असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच.
 
कळावे,
 
तुझा,
 
संजय (बंधू) ८ ऑगस्ट सत्र न्यायालय
 
Published By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांनी विमानतळावरून 4.37 किलो सोने जप्त केले, अंडरगारमेंटमध्ये लपवून होत होती सोन्याची तस्करी