Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ नागरिक आरोग्य : आई-वडिलांसोबत सुखाने जगण्यासाठी या गोष्टी करता येतील

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (15:21 IST)
मेधा कुलकर्णी
अनेक घरांमध्ये ' जरा काटकसर करावी, आमच्या काळी असं नव्हतं', 'आम्ही काय मुलं सांभाळली नाहीत का संसार केला नाही' असे संवाद एकीकडे असतात, तर दुसरीकडे, 'काय परत परत तेच ते सांगता?' 'आता सारखे धडे देणं बंद करा. 'तुमच्या तरुणपणी असेल तसं पण ते इतिहासात जमा झालंय.' अशा आशयाचे संवाद होत असतात.
 
त्यात भर म्हणून आई-वडिलांना कोणी असं वागवतं का? एवढंही समजून घेता येत नाही का? असे सल्लेही असतात. त्यात स्वभावाचे अनेक अप्रिय आणि विखारी पैलू वृद्ध आई-वडिलांकडून त्यांच्या मुलांना आणि मुलांकडून आई-वडिलांना पेलावे लागतात. अशा वेळी काय करता येऊ शकतं?
 
#वृद्धांचं पालकत्व हा फेसबुक ग्रुप चालवणाऱ्या मेधा कुलकर्णी काही खास टीप्स सांगत आहेत. 15 जून या ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिनानिमित्त.
 
मी पूर्ण वेळ नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली त्याला बारा वर्ष झाली. तेव्हा माझं वय होतं 53. माझ्या आईचं 75 आणि वडिलांचं 83. दोघांचीही तब्येत चांगली आणि दोघंही अगदी स्वावलंबी होते. फक्त म्हातारपणापायी शरीरमनाला येणारा थकवा त्यांना असायचा.
त्या आधीच वडिलांना डिमेंशियाचा आजार सुरू झाला होता; पण ते आम्हाला तेव्हा समजलेलं नव्हतं. पुढे या आजाराने वडिलांना होत्याचं नव्हतं करून सोडलं. तेव्हा संवाद अवघड होऊ लागला. अशा आजारपणातला संवाद आणि सांभाळ हे वेगळंच आव्हान.
 
स्वेच्छानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ घरी राहू लागले तेव्हा या दोघांशी 24x7 संबंध आला आणि मला जाणवलं की वृद्धांशी कसं वागायचं, त्यांचा मान राखत त्यांना कसं सांभाळायचं आणि हे करताना स्वत:चा संयम ढळू द्यायचा नाही, हे मलाच शिकण्याची गरज आहे.
कोणत्याही नात्यात असतं, तसं इथेही संवादाला खूपच महत्व आहे. जास्त काळ बाहेर राहात होते तेव्हाचा संवाद मोजका असायचा. आता जास्त काळ एकत्र राहायचं आणि नीट नांदायचं, तर तो संवाद कसा हवा, हेही उमगू लागलं.
 
आणि वृद्धांचं पालकत्व सुरू झालं...
मी माझा मित्र नामवंत मनोविकारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी याची मदत घेतली.त्याच्याशी चर्चा केली आणि माझं या विषयातलं वाचन, निरीक्षण वाढवलं. दरम्यान, मीही साठीचा टप्पा ओलांडून पुढे प्रवास सुरू केला. त्यामुळे दोन्ही कोनातून या विषयाला न्याहाळू शकते.
 
व्यक्तींचा स्वभाव, विचारांचा उदारपणा, जुळवून घेण्यातला लवचिकपणा, परिस्थितीची उमज, अप्रिय घटना मागे टाकण्याची तयारी यावर संवाद किती चांगला-वाईट होईल हे ठरत असतं. आणि हे सगळे विशेष माणसागणिक बदलतात.
आई-वडील यांचं वृद्धत्व अनुभवताना आणि सांभाळताना त्यांच्याबरोबर माझंही वय वाढत होतं. मीही नववृद्ध होऊ घातले होते. कौटुंबिक व्यापताप समजून घेतानाच हा मोठा सामाजिक प्रश्न आहे, याचंही भान होतंच. घरोघरी वृद्धांचं पालकत्व करणारेही वृद्धच आहेत, अशी स्थिती गेल्या 15-20 वर्षांपासून दिसतेय.
 
'कसं असेल माझं म्हातारपण?'
आईवडिलांची काळजी घेताना येणारे अनुभव मी 2010-11 पासून फेसबुकवर #वृद्धांचंपालकत्व या हॅशटॅगने शेअर करायला सुरूवात केली. या पोस्ट्सना चांगला प्रतिसाद मिळू लागला.
मित्र-मैत्रिणीही त्यांचे अनुभव शेअर करू लागले. काहीजण तर सल्लाही मागू लागले. या नावाने एखादा गृप सुरू करावा असं काहीजण सुचवू लागले. गेल्या वर्षी कोव्हिड अवतरल्यावर जाणवलं की वृद्धांचे आणि त्यांना सांभाळण्याचे प्रश्न अधिक बिकट होत चाललेत. तेव्हा अशा संवादाची, शेअरिंगची गरज वाढतेय.
 
अडचणी कोणत्या, त्यातून मार्ग काय काढला हे, संबंधित वैद्यकीय बाबी, देखभालीच्या यंत्रणा-सेवा वगैरेंचीही माहिती अशी एका ठिकाणी मिळत गेली तर चांगलंच. असे विविध हेतू मनात ठेवून वृद्धांचं पालकत्व हा ग्रुप सुरू केला.
आपण घरातल्या वृद्धांची देखभाल करतो किंवा अन्यत्र म्हाताऱ्या माणसांबरोबर वावरतो तेव्हा, कळत नकळत आपण स्वत: कोणत्या प्रकारचं म्हातारं माणूस व्हावं हे विचार मनात घोळत असतात, तर आपल्याला कसं म्हातारपण आवडेल हे विचारलं होतं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेकांनी लिहिलं. त्यात सर्वाधिक भर संवादावर होता.
 
म्हणजे, ग्रुप सदस्यांनी हे लिहिलं:
 
माझ्या/आमच्या वेळी अमूक असायचं तमूक असायचं असं सतत न सांगणारं. होता होईतो नव्या पिढीशी सांधा जुळवून ठेवणारं.मुलं-मुली, सून-जावई यांना मनातल्या भावना, विचार मोकळेपणे सांगणारं वगैरे.
 
दुखऱ्या मनाची समजूत कशी घालायची?
कोणत्याही माणसाला सर्वात आनंद देणारी सोबत असते समवयस्कांची. त्यातही ज्यांच्याशी छान जुळतं अशा मित्रमैत्रिणींची. अनुभवांची देवाण-घेवाण, विविध विषयांवर गप्पा, एकमेकांच्या दुखर्‍या मनाची समजूत घालणं, आनंद साजरे करणं हे सारं मैत्रीत चालतं. यासाठी भेटीगाठी व्हाव्या लागतात. वृद्धावस्थेत शारीरिक हालचालींना मर्यादा आली की, या भेटीगाठी रोडावतात, कधीतरी थांबतात.
आता, कोविडमुळेही त्या थांबल्याच आहेत. त्यातही, वृद्ध जोडपं असेल आणि त्यांचं एकमेकांशी सख्य असेल, तर त्यांचा आपसातला तरी संवाद सुरू राहातो. त्या जोडप्यातच विसंवाद असेल किंवा जोडिदाराविना एकएकट्या वृद्ध व्यक्ती राहात असतील तर, त्यांना आपसातल्या संवादापासून वंचित राहायला होतं. भेटणं शक्य नाही, तर फोन आणि हल्ली सोशल मीडिया हे संवादाचे मार्ग असतात. त्यासाठी हे मार्ग हाताशी असावे लागतात, ते हाताळताही यावे लगतात.
 
कुटंब असण्याचे काय फायदे?
वृद्ध, लहान मुलं किंवा अपंग अथवा आजारी अशा विशेष लक्ष द्याव्या लागणार्‍या व्यक्तींसाठी आपल्याकडे कुटुंब हे वरदान ठरू शकतं. वयाने ज्येष्ठ असणार्‍यांना वृद्धत्व येणं आणि वयाने कनिष्ठ असणार्‍यांना ज्येष्ठांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी लागणं, याला इलाज नाहीये - हे दोघांनीही स्वीकारणं ही संवादाची पहिली पायरी असते.
 
'बूढ़ों के साथ लोग कहाँ तक वफ़ा करें
 
बूढ़ों को भी जो मौत न आए तो क्या करें'
 
असं शायर अकबर इलाहाबादी सांगतात. वृद्धावस्था हा नाइलाज आहे, तर ही स्थिती दोहो बाजूंनी आनंदाची कशी करता येईल, किमान सुसह्य होईल हे पाहाणं हे आलंच.
 
'फोनवरुन गप्पा मारण्याचा नियम'
स्वेच्छानिवृत्तीमुळे मी आईवडिलांसाठी जास्त वेळ देऊ शकले. सध्या कोव्हिड काळात अनेकांचं घरून काम सुरू आहे. आता, घरातल्या वृद्धांसाठी आपसूकच वेळ देता येतोय, असा काही तरूण मित्र-मैत्रिणींचा अनुभव आहे. माझ्या एका मित्राच्या नव्वदी ओलांडलेल्या आईचं सगळ्यांना सांगणं असतं की, मला काही भेटवस्तू किंवा पदार्थ नका आणू. तुमचा फोन, तुम्ही भेटायला येणं हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. कुटुंबासोबत अन्य नातलग, मित्रमंडळ हा गोतावळा येतो.
माझ्या एका मैत्रिणीने कोव्हिडकाळात कुटुंबातल्या दररोज एका वृद्ध व्यक्तीशी फोन करून गप्पा मारायचा नियम केला आहे. अशा फोनसंवादाचं मोल ठरवण्याच्या पलीकडचं.
 
'काय तेच ते सांगता सारखं'
वृद्धांबरोबर बोलायचं तरी काय, असंही होऊन जातं. पिढ्यांचा फरक, त्यांचं बदललेल्या जगापासून दूर असणं, विस्मरण हे संवादातले अडथळे ठरतात.
 
तरीही, काही कौटुंबिक विषय सामायिक असतात. या मंडळींना आपण तरूणपणी काय केलं याविषयी पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. आपल्याला तेच तेच ऎकायचा कंटाळा येत असला तरी, त्यांचाही इलाज नाही, हे लक्षात घेऊन संवाद सुरू ठेवायला लागतो.
वृद्धांबरोबरचं बोलणं केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यापुरतंच राहू नये, हे बघावं लागतं. त्यांच्या आवडीनुसार त्यांना काही वाचून दाखवणं, ऎकवणं, त्यांच्यासोबत टिव्ही बघणं, एकत्र खाणं-पिणं-जेवणं हेही जमेल तसं करू शकतोच.
 
साधनांची रेलचेल, मोठी घरं असली तर वृद्धांना आरामदायी पद्धतीने ठेवता येतं. आणि सांभाळणार्‍यांनाही स्वतःचं खाजगीपण जपता येतं. पण अशी कुटुंबं मोजकीच. मुळात, वृद्धत्व हा एक सामाजिक प्रश्न आहे.
 
2025 साली वृद्धांची संख्या 32 टक्के?
भारतात, कोव्हिड काळात, गरीब वृद्धांच्या संख्येत मोठी वाढ होऊ घातलीये आणि त्यांची हलाखीही वाढत आहे, हे आंतरराष्ट्रीय जनसंख्या शास्त्र संस्थेच्या अहवालात नमूद आहे.
2011 च्या जनगणनेत साठ वर्षांवरील वृद्धांचं प्रमाण 8.6 टक्के होतं आणि दर वर्षी ते सुमारे 3 टक्क्यांनी वाढत आहे. साठ वर्षावरील नागरिकांची संख्या 2050 साली, 32 टक्के होईल, असा अंदाज आहे.
 
वृद्धांच्या संगोपनाविषयीचा कायदा
वृद्धांचं संगोपन मुलांनी करण्यासंबंधीचा कायदा 2007 मध्ये अस्तित्वात आला. यात, ज्येष्ठ नागरिकांना पाल्यांकडून निर्वाहखर्च देण्याची, पालकांचा सांभाळ न केल्यास तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
 
जिह्याजिल्ह्यात स्वतंत्र न्यायाधिकरण आहे. वृद्धांना झालेली शारीरिक दुखापत छळामुळे, दुर्वतनापायी झाली नाही याची खातरजमा उपचार करणार्‍या डॉक्टरनी पोलिसांकडून करून घ्यावी असा नियमदेखील आहे.
 
वृद्धांचा छळ होण्याचं वाढतं प्रमाण
त्याचबरोबर मुलं, सुना यांच्याकडून होणारा अपमान आणि छळ 70 टक्के वृद्ध सहन करतात असं हेल्पेज इंडिया या संस्थेच्या अभ्यासातून दिसतं. कारण, अगोदरच व्याधीजर्जर आणि असुरक्षित असलेल्या वृद्ध व्यक्ती आपल्या छळवणुकीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची हिंमत तरी कशी करणार? प्रत्यक्ष किंवा हेल्पलाइनवर तक्रार दाखल झाल्यास पोलिसांनी तड लावावी, पाठपुरावा करावा अशा सूचनाही आहेत.
युरोप-अमेरिकेप्रमाणे आपल्या देशात सरकारने वृद्धांचा आर्थिक भार उचलण्याची कल्याणकारी योजना नाही. मात्र, गेल्या पंधरावीस वर्षांत वृद्धकल्याणासाठी काम करणार्‍या संस्था, गट, सेवा यांची संख्या वाढत आहे.
 
वृद्धाश्रम ही संस्था आता नाइलाज राहिली नाही तर इलाजच ठरते आहे. आज तरी, सधन मंडळी या सेवांचा जास्त लाभ घेऊ शकतायत. गरीब वृद्धांचे प्रश्न सुटण्यासाठी मोठी तजवीज लागणार आहे.
 
कोव्हिडकाळात नवे प्रश्न पुढे आलेत. आरोग्यसेवा पुरेशी नसताना किंवा औषधांचा तुटवडा असताना आजारी वृद्धांना की तरुणांना प्राधान्य द्यायचं, saving life की saving life years यावर चर्चा सुरू आहे. इच्छामरण हाही नेहमीच चर्चेत असलेला विषय. वृद्धावस्थेच्या या कुरूप वास्तवात जगणार्‍यांना देण्यासाठी एक दिलासा आपल्या हाती नक्की आहे. तरूण पिढी जिच्या खांद्यावर उभी आहे, त्या जुन्या पिढीतल्या वृद्धांना कृतज्ञभावाने, होता होईतो जपून सांभाळणं, त्यांच्याशी सुखसंवाद सुरू ठेवणं.
 
(लेखिका संपर्क या सामाजिक संस्थेच्या संस्थापक, आकाशवाणीतल्या निवृत्त अधिकारी आहेत. त्या वृद्धांचं पालकत्व या विषयावर लेखन करतात. आणि याच नावाचा फेसबुक ग्रुप चालवतात.)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments