शरद पवार यांनी राफेल प्रकरणी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. बीड येथे बोलतांना पवार यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय चौकशीला सामोरे जावे असे सुचवले आहे. याच मुद्द्यावरून शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी मोदींचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपच्या विरोधकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पवारांच्या या वक्तव्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बीडमधील सभेत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी मी कोणाचेही समर्थन केले नव्हते करणार नाही. मात्र राफेल विमान खरेदी व्यवहारात मोठा आर्थिक गोलमाल झाला असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीला सामोरे गेले पाहिजे. विमानांची किंमत एवढी का वाढली, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी पवारांनी केली आहे. सरकार देत असलेली आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आवतण असल्याची टीकाही त्यांनी केली. दुसरीकडे शिवसेना देखील आक्रमक असून भाजपावर जोरदार टीका केली आहे.