“मला नेमका काय गोंधळ उडाला याची कल्पना नाही. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टात खूपदा मोठ्या वकिलांच्या वेळा अॅडजस्ट केल्या जातात. वकील सुरुवातीला नव्हते पण त्यानंतर अर्ध्या तासाने ते आले. युक्तिवाद झाला..चर्चा झाली. न्यायाधीशांनीही विषय़ घेतला, त्यावर निर्णय दिला. त्यामुळे त्याच्यावर टिका टिप्पणी करण्याची गरज नाही,” या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षण स्थगितीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
'या' विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही
गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केल आहे.
दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसैनिकांना दिले. त्याच्या याच विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काही कार्यक्रम झाले. त्याचा अर्थ आम्ही कॉंग्रेसला सोडले, असा होत नाही. कॉंग्रेसने देखील पक्षविस्तारासाठी काही उपक्रम राबविले तर, त्याचा वेगळा अर्थ निघत नाही, तसेच शिवसेनेने मेळावे घेतले, काही विधाने केली. संघटनात्मक विस्ताराचे कार्यक्रम केले, तर त्याचा अर्थ त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांपेक्षा वेगळा विचार मांडला असा होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा. कार्यक्रम राबविण्याचा अधिकार आहे. याबाबत काही बोलायचेच असेल, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरवतील. त्यांनाच याविषयी विचारा असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांच्या ट्विटला शरद पवार यांचा प्रतिसाद देतांना ते म्हणाले की, पंकजादेखील चांगले काम करत असल्याची कौतुकाची थाप शरद पवार यांनी मारली आहे. याआधी पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं ट्विट करत पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला होता. यालाच आता शरद पवार यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.