Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसृष्टी आशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

शिवसृष्टी आशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (08:50 IST)
पुणे : शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य आहे.  लोकांना प्रेरणा देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, डॉ.प्रविण दबडगाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते.
 
 शिवसृष्टीला भेट देताना कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण होते असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शिवसृष्टीचा हा उपक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा आज सुरू होत आहे. राज्य शासनाने यासाठी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकल्पाचे काम थांबणार नाही आणि अधिक वेगाने ते पूर्ण करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून देशाचा कारभार केला जात आहे. म्हणून शिवसृष्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही.
 
छत्रपती शिवाजी महाराज कुशल संघटक
 
छत्रपतींचे जीवीतकार्य हा महाराष्ट्राचा अभिमान होता. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी कार्य केले. ते कुशल संघटक, कुशल प्रशासक, कुशल निर्माते होते. दूरदृष्टी असलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून आदर्श उभा केला आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीचा दिवस सोहळ्याच्या रुपात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
 
शिवाजी महाराज हे दैवी शक्ती होते. त्यांचा आदर्श समोर ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी शासन कार्य करीत आहे. जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा झाला नाही. त्यांनी जगासमोर आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण आपल्या कार्यातून प्रस्तूत केले. इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती याचा प्रत्यय येईल.
 
कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित स्थळांना भेट देऊन शिवरायांचा इतिहास जगभरात पोहोचवला. शिवाजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आपले वैभव आहे. गड-किल्ल्यांवर त्यांनी केलेल्या सुविधा अद्भूत आहेत. ते जतन करण्याचे कार्य राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. इथे येणारा प्रत्येकजण ऊर्जा घेऊन जाईल आणि संस्कारकेंद्र म्हणून याची ओळख स्थापित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
 
शिवसृष्टी आशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
 
शिवसृष्टीचा प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून श्री.शाह म्हणाले,  पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले आहेत. इथे भेट देणारा शिवाजी महाराजांच्या जीवनातून मिळणारा संदेशही सोबत घेवून जाईल. शिवसृष्टी आशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल.
 
इतिहासातील सूक्ष्म बाबींना संशोधनपूर्वक मांडल्याने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय इथे दिसून येतो. इतिहासाला जीवंत रुपात साकारण्याचा हा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या जीवनसंदेशाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. देशभरातील शिवभक्तांसाठी आणि जगभरातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्वाचे स्थळ होईल.
 
छत्रपती शिवरायांचे कार्य देशभरातील जनतेला प्रेरित करणारे आहे. हे कार्य घरोघरी पोहोचविण्यात कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मोठे योगदान आहे. जगभरातील अधिकृत दस्तावेजाचे संकलन करून नव्या पिढीसाठी शिवचरित्राची रचना करून त्यांनी नव्या पिढीवर मोठे उपकार केले आहे. त्यांनी 12 हजारापेक्षा अधिक व्याख्याने आणि जाणता राजाचे 1200 पेक्षा अधिक प्रयोग करून शिवसृष्टीसाठी योगदान दिले. जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून युवकांवर देशभक्तीचे संस्कार प्रभाविपणे झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे देशाच्या इतिहासात मोठे योगदान
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्याची प्रेरणा सत्ता नव्हती, तर  अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, स्वधर्माप्रती निष्ठेसाठी, स्वभाषेला महत्वाचे स्थान देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे जीवन होते. भारतावर कुणीही अत्याचार करू शकत नाही हा संदेश त्यांनी स्वराज्य स्थापना करून जगाला दिला. त्यांचा हा विचार त्यांच्या नंतरही प्रेरणादायी ठरलेला दिसून येतो. 1680 नंतरही त्यांच्या कार्याला, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. स्वराज्याची ही यात्रा अटक ते कटक आणि गुजरात ते बंगालपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण भारताला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात होते.
 
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी शिवरायांचा आग्रह
 
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी शिवाजी महाराज आग्रही होते. आपल्या संस्कृती आणि धर्मानुसार शासन चालावे असे प्रयत्न त्यांनी केले. स्वभाषेत राजव्यवहार कोष  सर्वप्रथम तयार करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. स्वराज्यासोबत सुराज्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शासनाला आठ विभागात वर्गीकरण करून शासनाच्या कार्याला लिपीबद्ध करण्याचे कार्य केले. स्वराज्यासोबत सुराज्याची कल्पना त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे केली.
 
 छत्रपती शिवाजी महाराज युद्धभूमीवर अग्रेसर राहून लढणारे साहसी योद्धा होते. एक कोटी सिंहांचे काळीज त्यांच्याकडे होते हे अफजलखान वधाच्या प्रसंगावरून  दिसून येते. उपभोगशून्य राजा कसा असावा याचे उदाहरण महाराजांनी आपल्यासमोर ठेवले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे कार्य केले. मराठी नौसेनेचे संस्थापक म्हणूनही त्यांचे कार्य महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ राजाचे जीवन नसून एक विचार आहे. हा विचार शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास श्री.शाह यांनी व्यक्त केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली

LIVE: मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रायगड मध्ये समुद्रात बुडून महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

पुढील लेख
Show comments