पुण्यातील सिंहगड घाटाच्या रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना अजूनही घडत असल्यामुळे खबरदारी म्हणून अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वनविभागाने याबाबत माहिती दिली. गेल्या 15 दिवसांमध्ये नऊ किलोमीटरच्या या घाटरस्त्यावर दोन वेळा दरड कोसळली आहे. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घाटरस्ता वाहतुकीला बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयआयटीच्या तज्ञांकडून तपासणी केली आहे. अहवाल येईपर्यंत घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे अशी माहिती वनविभागाने दिली. रविवारी 30 जुलै रोजी सिंहगडावर जाणाऱ्या घाटात सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली होती.