राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने दिवसाचे कमाल तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे अद्याप उन्हाचा चटका जाणवत नाही. अनेक भागात रात्री गारवा जाणवतो आहे. त्याचवेळी विदर्भामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून सध्या वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ते तमिळनाडूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडय़ातील काही भागातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भामध्ये १० ते १२ मार्च या कालावधीत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा किंचितसा वाढत असला, तरी अद्यापही राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी खाली आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवत नाही. रात्रीचे किमान तापमानही अनेक ठिकाणी सरासरीच्या खाली आल्याने रात्री आणि पहाटे गारवा जाणवतो आहे. रविवारी नाशिक येथे नीचांकी १२.३ अंश किमाल तापमानाची नोंद झाली. पुणे, जळगाव, सातारा आदी भागातही रात्री गारवा आहे. मुंबईतही कमाल आणि किमान तापमान सरासरीखालीच आहे. मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, औरंगाबाद येथेही रात्रीचे तापमान सरासरीखाली असल्याने काहीसा गारवा आहे. विदर्भातही अद्याप अकोला वगळता कुठेही उन्हाचा चटका नाही.