Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रिया सुळे म्हणतात, ‘भुजबळांना करारा जवाब दिला असता’; भुजबळ म्हणतात, ‘सुप्रियाताई मुलीसारख्या’

supriya sule chagan bhujbal
, मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (11:32 IST)
BBC Marathi
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळणार अशी खात्री आहे," असं अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
 
ते पुढे म्हणाले, "शरद पवारच पक्षाचे संस्थापक आहेत. परंतु पक्षात बदल होत जातात. हे बदल सर्वांना मान्य असतीलच असं नाही."
 
तसंच छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवरही भाष्य केलं आहे.
 
6 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या निवडणूक आयोगातील सुनावणीसाठी शरद पवार स्वतः हजर होते. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले होते, कोर्ट-कचेरी करणार नाही म्हणाले तेच आयोगात हजार होते.
 
भुजबळांच्या या प्रतिक्रियेवर खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असताना सोलापूर दौऱ्यावर असताना त्या म्हणाल्या, "भुजबळ सतत शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही. माझ्या वयाचे असते तर करारा जवाब दिला असता."
 
यासंदर्भात छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "मी शरद पवार यांच्यावर टीका केलेली नाही. सुप्रिया सुळे या मला बहिणीप्रमाणे, मुलीप्रमाणे आहेत. मी काही टीका केलेली नाही. मी फक्त काही प्रश्न विचारलेत."
webdunia
BBC Marathi
अजित पवार गटाने दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह शरद पवार यांना मिळणार की अजित पवार यांना मिळणार याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.
 
परंतु आजही अजित पवार गटाने पक्षावर केलेल्या दाव्यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होतात. पक्ष आणि चिन्हावरील दावा अजित पवार गटाने कशाच्या आधारावर केला आहे? अजित पवार यांनी नवीन पक्ष का स्थापन केला नाही? पक्ष आपल्यालाच मिळेल असा विश्वास अजित पवार गटाला का आहे? असे अनेक प्रश्न बीबीसी मराठीने मंत्री छगन भुजबळ यांना विचारले. या मुलाखतीत ते काय म्हणाले पाहूया.
 
प्रश्न - शिंदे गटाप्रमाणे तुम्हालाही पक्ष आणि चिन्ह मिळेल असा विश्वास वाटतो का?
 
छगन भुजबळ - 80 टक्के लोकप्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. तसंच हजारोने कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. आम्ही हे सगळं निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. ते छाननी करतील. ते नियमाप्रमाणे निर्णय घेतील. यात आम्हाला खात्री वाटते की चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळेल.
 
प्रश्न- शरद पवार गटाचा युक्तीवाद आहे की, तुम्ही नव्याने केलेल्या नियुक्त्या कशाच्या आधारावर केल्या? शरद पवार अध्यक्ष असताना अजित पवार अध्यक्ष कसे नेमले?
 
छगन भुजबळ - मी वकील नाही. हे सगळं जे काम आहे कायदेशीर तटकरे, अजित पवार आणि पटेल आणि पक्षाचे प्रतिनिधी यांनी मिळून ठरवलं आणि संबंधितांना कलवलेलं आहे. आता प्रकरण आयोगाकडे आणि कोर्टात गेलेलं आहे. प्रकरण कोर्टात जातं केव्हा जेव्हा दोन गट एकमेकांना असत्य आहेत बोलतात.
 
प्रश्न - आमदारांच्या संख्याबळावर पक्ष कोणाचा हे ठरवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. हा मुद्दा तुमच्या गटालाही लागू होतो.
 
छगन भुजबळ - आता दोन्ही बाजूकडून हे होत राहणार. निवडणूक आयोगाचा निर्णय येईल आणि तो आमच्या बाजूने येईल असा आम्हाला विश्वास आहे.
 
प्रश्न - हा विश्वास कशाच्या आधारावर वाटतो की पक्ष आणि चिन्ह तुम्हालाच मिळेल?
 
छगन भुजबळ - आमदारांच्या संख्याबळावर आणि राज्यभरातून जे लोक आमच्यासोबत आहेत. ते अजित पवार यांना भेटायला येतात. त्यांना समर्थन देतात.
 
प्रश्न - जयंत पाटील म्हणाले की, कोणीही सांगेल की पक्ष हा शरद पवार यांचा आहे. तुमची काय प्रतिक्रिया?
 
छगन भुजबळ - हे तर मान्यच करायला पाहिजे की शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत. त्यानंतर ते अध्यक्ष झाले. मी प्रांताध्यक्ष होतो. पण संस्थापक असले तरी काही काळाने त्यांच्यात बदल होतच राहत असतो. काँग्रेसमध्येही बदल झाला. तसा तो राष्ट्रवादीतही झाला.
 
प्रश्न - अजित पवार गटाने जे बदल केलेत ते शरद पवार यांच्या मान्यतेने केलेले नाहीत. यावर काय सांगाल?
 
छगन भुजबळ - सगळेच बदल सगळ्यांना मान्य नसतात. संख्याबळ कोणाकडे किती आहे यावर सगळं ठरत असतं.
 
प्रश्न - सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की तुम्ही तीव्र टीका करत आहात पण तुमचं वय पाहून तुम्हाला उत्तर देत नाही.
 
छगन भुजबळ - सुप्रिया सुळे मला बहिणीप्रमाणे, मुलीप्रमाणे आहेत. मी काय टीका केली, मी फक्त प्रश्न विचारले की मागच्या काही वर्षात ज्या घटना घडल्या त्याचा अर्थ काय घ्यायचा. मी शरद पवार यांच्यावर टीका केलेली नाही. आम्ही सगळ्यांनी पक्षासाठी काम केलेले आहे.
 
मी पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून सोबत होतो. तुम्ही आमचे प्रमुख होतात पण आम्ही डावे-उजवे हात होतोच ना पक्षाचे. तुमचं योगदान जास्त होतं पण आमचाही खारीचा वाटा होता.
 
प्रश्न - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह कसं ठरलं?
 
छगन भुजबळ - मी विरोधी पक्षनेते असताना माझ्याच सरकारी बंगल्यात पक्षाबाबत चर्चा झाली. पक्षाचं नाव, चिन्ह ठरलं. त्यावेळी मी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होतो. विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, जयंत पाटील आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर नावही त्याप्रमाणे काही असावं असं ठरलं.
 
मग इंडियन नॅशनलिस्ट काँग्रेसच्या धर्तीवर नॅशनलिस्ट काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असं नाव ठरलं.
 
झेंडा सुद्धा सर्वसाधारण काँग्रेससारखाच करायचं ठरलं. मग घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवलं. परंतु त्यांनी सांगितलं की जेडीयू की जनता दलाचं चिन्ह तसास भास होणार हे आहे. मग आम्ही घड्याळ्याला खाली दोन स्टँड लावले. म्हणजे आलार्म क्लाॅकसारखं ते निश्चित झालं. ते मंजूरही झालं.
 
प्रश्न - अनेकदा लोक हा प्रश्न विचारतात की, एवढा संघर्ष करण्यापूर्वी अजित पवार स्वतः चा पक्ष का नाही स्थापन करत? त्यांना शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष का हवाय?
 
छगन भुजबळ - आता आख्खा पक्षच जर आमच्याकडे आला असेल थोडे लोक सोडले तर मग कशाला नवीन पक्ष स्थापन करायचा आम्ही. नागालँडपासून सगळेच आमच्याकडे आले तर नवीन पक्ष काढण्याची काय आवश्यकता नाही. आता कोर्टाने सांगितलं किंवा आयोगाने सांगितलं तर बघू पण तशी काही परिस्थिती नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Exchange Rs 2000 notes 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी