अहमदपूर तालुक्यांतील २३ वर्षीय मुलीला घरात एकटीच असताना जबर मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सर्व आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. मुलीला अमानुषपणे मारहाण करून तिचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. या घटनेबद्दल मुलीच्या कुटुंबियांकडून प्रकरणाची माहिती घेऊन मुलीच्या प्रकृतीची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विचारपूस केली. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही निवेदन देण्यात आले असून डॉ.गोऱ्हे यांनी तातडीने मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणातील पीडितेला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी पीडित मुलगी तसेच मुलीच्या आईबरोबर फोनवरून बोलत मुलीच्या तब्येतीविषयी विचारपूस केली व धीर दिला.
तक्रारदाराच्या तक्रारीची तात्काळ नोंद न घेणाऱ्या किनगाव पोलिस ठाणे,अहमदपूर यांची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आरोपीस अद्यापही अटक झालेली नाही. या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्यास संबंधित तपास अधिकारी यांना सूचना द्याव्यात तसेच या घटनेचा तपास कमीत कमी वेळेत पूर्ण करावा व या केसचे आरोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करावे, आणि आरोपींना जामीन मिळणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना द्यावी असे निर्देश देण्यासाठी संबंधित पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुलीला संरक्षण द्यावे तसेच मनोधैर्य योजनेतून मदत मिळावी. आरोपींना कठोरात-कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत यासाठी पोलीस महानिरीक्षक, लातूर पोलीस अधीक्षक यांच्याशी व वरील बाबीबाबत तपास करणारे पोलीस अधिकाऱ्यांना डॉ.गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत.